रेतीची चोरटी वाहतूक करणारे चार टिप्पर पकडले; १ कोटी १० लाख ८४ हजारांचा मुद्देमाल जप्त
बुलढाणा, ११ सप्टेंबर २०२६: जिल्ह्यात विनापरवाना व अवैधरित्या गौण खनिज रेतीची चोरटी वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई करत चार टिप्पर पकडले. या कारवाईत चार टिप्पर व १४ ब्रास रेती असा एकूण १ कोटी १० लाख ८४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, चार आरोपींविरुद्ध अंढेरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्ह्यात विनापरवाना व अवैधरित्या गौण खनिज रेतीची वाहतूक करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर प्रचलित कायद्यानुसार कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेने स्वतंत्र पथके तयार करून अवैध रेती वाहतुकीवर लक्ष केंद्रित केले होते.
दरम्यान, ११ सप्टेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला अंढेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नारायणखेड शिवारातून काही जण टिप्परच्या माध्यमातून रेतीची चोरटी वाहतूक करीत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पथकाने देऊळगाव राजा ते चिखली मार्गावरील अंढेरा फाटा येथे सापळा रचून नाकाबंदी केली.
या कारवाईदरम्यान रविंद्र साहेबराव इंगळे (वय ३१, रा. भानखेड, ता. चिखली), विष्णू उत्तम इंगळे (वय ४०, रा. भानखेड, ता. चिखली), आतिष जयवंता मादनकर (वय ४२, रा. भानखेड, ता. चिखली) आणि प्रसाद पंडीत मुरडकर (वय २५, रा. भानखेड, ता. चिखली) हे विनापरवाना व अवैधरित्या रेतीची वाहतूक करताना आढळून आले.
पोलिसांनी कारवाईत एमएच २८ बी ८९५२ क्रमांकाचा टिप्पर, एमएच २८ बीबी ७२९९ क्रमांकाचा टिप्पर, एमएच २८ एबी ७५०९ क्रमांकाचा टिप्पर आणि एमएच २८ एबी ७६१४ क्रमांकाचा टिप्पर जप्त केला. या चार वाहनांची अंदाजे किंमत १ कोटी १० लाख रुपये असून, त्यासोबत १४ ब्रास रेतीची अंदाजे ८४ हजार रुपये किंमत आहे. अशा प्रकारे एकूण १ कोटी १० लाख ८४ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला.
या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक प्रताप बाजड यांच्या तक्रारीवरून आरोपींविरुद्ध अंढेरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३ (२) तसेच गौण खनिज अधिनियमाच्या कलम २१ (१) व २१ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास अंढेरा पोलीस ठाण्याच्या पथकाकडून करण्यात येत आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या आदेशान्वये, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड आणि अपर पोलीस अधीक्षक, खामगाव पियुष जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत ठाकरे यांच्या नेतृत्वात करण्यात आली. कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक यशोदा कणसे, पोलीस उपनिरीक्षक प्रताप बाजड, पोलीस हेड कॉन्स्टेबल शरदचंद्र गिरी, जगदेव टेकाळे, पुरुषोत्तम आघाव, युवराज राठोड, विजय वारुळे, तसेच पोलीस कॉन्स्टेबल अमोल अंभोरे, मंगेश सनगाळे, अमोल वनारे, मनोज खरडे आणि महिला पोलीस कॉन्स्टेबल पूजा जाधव यांचा सहभाग होता.


