Buldhana News

बुलढाण्यात पोलीस स्मृती दिनानिमित्त शहीद पोलिसांच्या कुटुंबीयांचा कृतज्ञतापूर्वक सन्मान

बुलढाणा, दि. २१ ऑक्टोबर २०२६ : पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, सदानंद दाते यांच्या संकल्पनेतून पोलीस स्मृती दिनानिमित्त बुलढाणा जिल्ह्यातील शहीद पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांचा कृतज्ञतापूर्वक सन्मान करण्यात आला. पोलीस मुख्यालय, बुलढाणा येथे बुधवारी सकाळी आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे आणि पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या हस्ते शहीद पोलिसांच्या कुटुंबीयांना पोलीस महासंचालकांच्या स्वाक्षरीचे कृतज्ञता पत्र व भेटवस्तू प्रदान करण्यात आल्या.

२१ ऑक्टोबर १९५९ रोजी लडाखमधील हॉट स्प्रिंग येथे भारताच्या सीमेचे रक्षण करताना केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सीआरपीएफ) दहा जवान शहीद झाले होते. या वीर जवानांच्या स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षी २१ ऑक्टोबर हा दिवस पोलीस स्मृती दिन म्हणून आदरपूर्वक पाळला जातो. देशाच्या सुरक्षेसाठी आणि जनतेच्या संरक्षणासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या शौर्याचे स्मरण या दिवशी केले जाते.

बुलढाणा पोलीस मुख्यालयाच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमाच्या प्रारंभी देशभरातील शहीद पोलीस अधिकारी व अंमलदारांच्या नावांचे वाचन करण्यात आले. त्यानंतर बंदुकीच्या तीन फैरी झाडून शोक सलामी देण्यात आली. उपस्थित मान्यवरांनी शहीद स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून वीर जवानांना आदरांजली वाहिली.

महाराष्ट्र पोलीस दलातील अनेक शूर अधिकारी व जवानांनी नक्षलविरोधी मोहिमा, दहशतवादविरोधी लढा, कायदा व सुव्यवस्था राखणे तसेच नागरिकांच्या जीविताचे आणि मालमत्तेचे संरक्षण करताना सर्वोच्च बलिदान दिले आहे. त्यांच्या शौर्याचा गौरव करण्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबीयांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमात शहीद पोलीस निरीक्षक यादवराव सखाराम पवार (तत्कालीन नियुक्ती, बुलढाणा) आणि शहीद पोलीस शिपाई सर्जेराव एकनाथ खार्डे (बक्कल क्रमांक ३६४१, तत्कालीन नियुक्ती, गडचिरोली) यांच्या कुटुंबीयांना जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे आणि पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या हस्ते कृतज्ञता पत्र व भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.

तसेच शहीद पोलीस शिपाई राजू नारायण गायकवाड (बक्कल क्रमांक ३५३४, तत्कालीन नियुक्ती, गडचिरोली) आणि सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विष्णू खंडूजी दसरे (बक्कल क्रमांक ८४८, तत्कालीन नियुक्ती, बुलढाणा) यांच्या कुटुंबीयांनाही त्यांच्या मूळ गावी संबंधित पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांच्या हस्ते कृतज्ञता पत्र व भेटवस्तू प्रदान करण्यात आल्या. मेहकर आणि लोणार पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांमार्फत हा सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे उपस्थित होते. पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली. यावेळी अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावार, पोलीस उपअधीक्षक (मुख्यालय) यांचा प्रभार सांभाळणारे पोलीस निरीक्षक रवि राठोड यांच्यासह बुलढाणा पोलीस दलातील अधिकारी, अंमलदार, मंत्रालयीन अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

शहीद पोलीस जवानांचे बलिदान देशाच्या इतिहासात सदैव स्मरणात राहावे आणि त्यांच्या कुटुंबीयांप्रति समाजाची कृतज्ञता व्यक्त व्हावी, हा पोलीस स्मृती दिनाच्या आयोजनामागील प्रमुख उद्देश आहे.

Zafar Khan

Zafar Khan Athar Khan is the Editor-in-Chief of Viral News Live, a daily newspaper covering news from Buldhana district and across Maharashtra. He is an active journalist committed to public interest reporting, focusing on local governance, crime news, social issues, and matters affecting the common people. He currently serves as the District President of Voice of Media (Urdu Wing) in Buldhana and works to strengthen responsible journalism and raise important public issues through independent media. Contact Information Email: zafar@viralnewslive.in Mobile: +91 9881850730

Zafar Khan has 226 posts and counting. See all posts by Zafar Khan

Leave a Reply