महिला व बालकांच्या सुरक्षेसाठी बुलढाणा जिल्ह्यात ‘प्रोजेक्ट संजीवनी’चा शुभारंभ
विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. महेश पाटील यांच्या हस्ते उद्घाटन; जिल्ह्यातील पाचही उपविभागांत जनजागृती व प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविणार



बुलढाणा : महिला व बालकांच्या सुरक्षिततेसाठी बुलढाणा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ‘प्रोजेक्ट संजीवनी’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचा शुभारंभ बुधवार, १४ ऑक्टोबर २०२६ रोजी सहकार विद्या मंदिर, बुलढाणा येथे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. महेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. महेश पाटील होते, तर जिल्हाधिकारी प्रविण देवरे यांची प्रमुख उपस्थिती होती. पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या उपक्रमाद्वारे महिलांना निर्भय जीवन आणि बालकांना सुरक्षित बालपण मिळावे, यासाठी जनजागृती, समुपदेशन आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर देण्यात येणार आहे.
समाजातील प्रत्येक महिलेला सन्मानाने आणि निर्भयपणे जगण्याचा, तसेच प्रत्येक बालकाला सुरक्षित वातावरणात वाढण्याचा अधिकार आहे. याच उद्देशाने बुलढाणा जिल्हा पोलीस दलाने ‘प्रोजेक्ट संजीवनी’ हा संवेदनशील आणि लोकाभिमुख उपक्रम सुरू केला आहे. कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांनी या उपक्रमाच्या कार्यप्रणालीचे कौतुक करून महिला व बालकांच्या सुरक्षेसाठी सामूहिक प्रयत्नांचे महत्त्व अधोरेखित केले.
या कार्यक्रमाला बुलढाणा को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे अध्यक्ष डॉ. सुकेश झंवर, दिशा संस्थेचे संचालक अॅड. प्रविण खांडपासळे आणि डॉ. सतीश जाधव यांची विशेष उपस्थिती होती. तसेच खामगावचे अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप, विविध उपविभागांचे पोलीस अधिकारी, महिला व बालकल्याण विभागाचे अधिकारी, पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी, शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
समुपदेशनापासून आपत्कालीन मदतीपर्यंत विविध उपक्रम
‘प्रोजेक्ट संजीवनी’अंतर्गत जिल्ह्यातील पाचही पोलीस उपविभागांमध्ये महिला व बालकांच्या सुरक्षेसाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. कौटुंबिक कलह, मानसिक तणाव, सामाजिक दबाव आणि इतर समस्यांचा सामना करणाऱ्या महिला व बालकांना समुपदेशन, मानसिक आधार आणि कायदेशीर मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यांच्या समस्या संवेदनशीलतेने समजून घेऊन त्यांना मदतीसाठी विश्वासाचे वातावरण निर्माण करण्यावर भर दिला जाणार आहे.
शाळा आणि महाविद्यालयांमध्ये ‘पोलीस काका’ व ‘पोलीस दीदी’ यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षिततेबाबत जागरूकता निर्माण केली जाणार आहे. गुड टच-बॅड टच, बाललैंगिक अत्याचारापासून संरक्षण, सायबर सुरक्षा, समाजमाध्यमांचा जबाबदारीने वापर आणि संकटाच्या वेळी मदत मिळविण्याचे मार्ग याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे.
बालविवाह रोखण्यासाठी पालक, शिक्षक, ग्रामस्थ आणि समाजातील विविध घटकांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे. बालविवाहाची माहिती मिळाल्यास संबंधित यंत्रणांशी समन्वय साधून तातडीने कार्यवाही करण्यावरही विशेष भर दिला जाणार आहे.
महिला व मुलींच्या सुरक्षेसाठी दामिनी पथकांकडून शाळा, महाविद्यालये, बाजारपेठा, बसस्थानके आणि महिलांची वर्दळ असलेल्या ठिकाणी नियमित गस्त घालण्यात येणार आहे. छेडछाड, पाठलाग आणि गैरवर्तन यांसारख्या प्रकारांना प्रतिबंध घालून संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई करणे हे या पथकाचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
आपत्कालीन परिस्थितीत पोलिसांची तातडीने मदत मिळविण्यासाठी डायल ११२ या सेवेसंदर्भात महिला व बालकांमध्ये जागरूकता निर्माण केली जाणार आहे. तसेच हरविलेल्या महिला व मुलींचा शोध घेण्यासाठी तांत्रिक साधने, तपास कौशल्य आणि विविध यंत्रणांमधील समन्वयाचा प्रभावी वापर केला जाणार आहे. महिलांविरोधातील गुन्हे रोखण्यासाठी जनजागृती, प्रभावी पोलीस गस्त, तक्रारींवर कायदेशीर कार्यवाही, समुपदेशन आणि नागरिकांचा सहभाग या माध्यमांतून सुरक्षित वातावरण निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
आंतरराष्ट्रीय पॅरा बॅडमिंटनपटू तुलिका जाधव ब्रँड अॅम्बेसेडर
बुलढाणा जिल्हा पोलीस दलाच्या ‘प्रोजेक्ट संजीवनी’ची ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून आंतरराष्ट्रीय पॅरा बॅडमिंटन पदकविजेती तुलिका सतीशचंद्र जाधव यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या माध्यमातून महिला व बालकांच्या सुरक्षिततेचा संदेश अधिक व्यापक स्तरावर पोहोचविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
कार्यक्रमादरम्यान बुलढाणा येथील शिवरंजन नाट्यसंस्थेच्या वतीने शुभम गवई यांनी ‘प्रोजेक्ट संजीवनी’वर आधारित पथनाट्य सादर केले. या सादरीकरणातून महिला व बालकांच्या सुरक्षेचे महत्त्व आणि सामाजिक जागरूकतेची गरज अधोरेखित करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी केले, तर आभार प्रदर्शन बुलढाण्याचे अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड यांनी केले. यावेळी खामगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील, मलकापूरचे सोहन माछरे, बुलढाण्याचे विलास यामावार, देऊळगाव राजाचे अर्जुन ठोसरे, जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी अमोल दिघोळे, जिल्हा परिषद महिला व बालकल्याण अधिकारी प्रमोद इंडोले आणि महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी राजेश नागपुरे यांच्यासह विविध पोलीस ठाण्यांचे व शाखांचे अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालयांमधील सुमारे १२०० विद्यार्थिनी आणि शिक्षकवृंदांनीही कार्यक्रमाला उपस्थिती लावली.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी स्थानिक गुन्हे शाखा आणि जिल्हा विशेष शाखेतील अधिकारी व अंमलदार यांनी विशेष प्रयत्न केले.

