बैल तुमचा, रंग आमचा’; अभि पेंट गॅलरीकडून ८८ गावांतील शेतकऱ्यांना बैलपोळ्याची अनोखी भेट

मुक्ताईनगर : बैलपोळ्याच्या पार्श्वभूमीवर शेतकरी आणि त्यांच्या सर्जा-राजाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मुक्ताईनगर येथील अभि पेंट गॅलरीचे संचालक पंकज झनके यांनी अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. ‘बैल तुमचा, रंग आमचा’ या संकल्पनेतून मुक्ताईनगर तालुक्यातील ८८ गावांतील शेतकऱ्यांच्या बैलजोड्यांना बैलांच्या सजावटीसाठी मोफत रंग उपलब्ध करून देण्यात येत असून, बैलांना रंग लावण्यासाठी पेंटरची सुविधाही गॅलरीच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आली आहे.
प्रवर्तन चौक, जुन्या बसस्थानक मार्गासमोर असलेल्या अभि पेंट गॅलरीमध्ये शेतकरी आपल्या बैलांसह येत असून त्यांच्या बैलांना मोफत रंग लावून देण्यात येत आहे. बैलपोळ्याच्या निमित्ताने बैलांची आकर्षक सजावट करण्यासाठी होणारा खर्च कमी व्हावा आणि शेतकऱ्यांना सणाचा आनंद घेता यावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
या उपक्रमाचे वैशिष्ट्य केवळ मोफत रंग देण्यापुरते मर्यादित नसून बैलांसह येणाऱ्या शेतकरी मालकाचा सन्मानही करण्यात येत आहे. शेतकऱ्यांना रुमाल व टोपी भेट देण्यात येत असून, बैलांसाठी पुरणपोळीचा अल्पोपहार देण्यात येत आहे. त्यामुळे शेतकरी आणि त्यांच्या पशुधनाप्रती आपुलकी व्यक्त करणारा हा उपक्रम ठरत आहे.
शेतकरी हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा आधार असून, पारंपरिक शेती व्यवस्थेत बैलांचे स्थानही तितकेच महत्त्वाचे राहिले आहे. आधुनिक यंत्रसामग्रीचा वापर वाढला असला तरी बैलपोळ्याच्या माध्यमातून शेतकरी आणि बैल यांच्यातील जिव्हाळ्याचे नाते आजही जपले जाते. या पार्श्वभूमीवर बैलांच्या सजावटीचा खर्च कमी करून शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
तालुक्यातील विविध गावांमध्ये या उपक्रमाची माहिती पोहोचली असून शेतकरी बांधवांकडून त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. विविध गावांतील बैलजोड्यांच्या सजावटीचे काम सुरू झाले असून बैलपोळ्याच्या उत्सवात या उपक्रमामुळे शेतकऱ्यांचा आनंद द्विगुणित झाल्याचे चित्र आहे.
अभि पेंट गॅलरीचे संचालक पंकज झनके यांच्या या उपक्रमाचे सामाजिक कार्यकर्ते, शेतकरी आणि नागरिकांकडून कौतुक होत आहे. व्यावसायिक उपक्रमासोबत सामाजिक बांधिलकी जपत शेतकरी बांधवांना प्रत्यक्ष मदत करण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला आहे.
बैलपोळा हा शेतकरी आणि त्याच्या सर्जा-राजाच्या नात्याचा उत्सव मानला जातो. ‘बैल तुमचा, रंग आमचा’ या संकल्पनेतून या नात्याला सन्मान, आपुलकी आणि सामाजिक बांधिलकीची जोड देण्यात आली आहे. अशा उपक्रमांना प्रोत्साहन मिळाल्यास ग्रामीण भागातील सामाजिक सहभागाची भावना अधिक बळकट होण्यास मदत होईल.

