मुक्ताईनगर प्रतिनिधी…..
जळगाव ते छत्रपती संभाजीनगर दरम्यान साकारल्या जाणाऱ्या सहापदरी ‘खान्देश एक्सप्रेस’ महामार्गाला खान्देशच्या सुकन्या आणि देशाच्या माजी राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील यांचे नाव देण्यात यावे, अशी आग्रही मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि विधान परिषद सदस्य आमदार एकनाथराव खडसे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. जळगाव जिल्ह्याचे नाव जागतिक नकाशावर नेणाऱ्या एका उच्चशिक्षित आणि सुसंस्कृत कुटुंबातील नेतृत्वाचा हा उचित सन्मान ठरेल, असे त्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात नमूद केले आहे.
आमदार एकनाथराव खडसे यांनी नुकत्याच पार पडलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये या १०५ किलोमीटर लांबीच्या महामार्गाचा प्रश्न लावून धरला होता. हा महामार्ग पुढे समृद्धी महामार्गाला जोडला जाणार असून, सध्या या प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. या पार्श्वभूमीवर, श्रीमती प्रतिभाताई पाटील यांनी राज्याचे मंत्री, राज्यपाल आणि देशाचे सर्वोच्च राष्ट्रपती पद अत्यंत सक्षमपणे भूषवून महाराष्ट्राचा गौरव वाढवला असल्याकडे खडसे यांनी लक्ष वेधले आहे. खान्देशच्या मातीतील एका उच्चशिक्षित कुटुंबातून येऊन देशाच्या सर्वोच्च पदापर्यंत पोहोचणाऱ्या या थोर व्यक्तिमत्त्वाचे नाव महामार्गाला दिल्यास ते संपूर्ण राज्यासाठी प्रेरणादायी ठरेल, असे त्यांनी म्हटले आहे.
राज्यातील इतर प्रमुख महामार्गांना ज्याप्रमाणे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, स्व. यशवंतराव चव्हाण आणि स्व. अटलबिहारी वाजपेयी यांसारख्या थोर आणि मार्गदर्शक नेतृत्वांची नावे देऊन त्यांचा गौरव करण्यात आला आहे, त्याच धर्तीवर प्रतिभाताई पाटील यांचे नाव या ‘खान्देश एक्सप्रेस’ला देणे अत्यंत सयुक्तिक आणि न्याय्य ठरेल.
तरी, लोकभावनेचा आदर करून मुख्यमंत्री महोदयांनी या प्रस्तावाचा सकारात्मक विचार करावा आणि संबंधित विभागाला तात्काळ निर्देश द्यावेत, अशी विनंती आमदार एकनाथराव खडसे यांनी केली आहे.




