बुलढाणा, दि. ३१ जुलै : बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहर परिसरात एलपीजी गॅसची चोरी करून त्याची साठवणूक आणि काळ्या बाजारात विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या अवैध रॅकेटचा राज्यस्तरीय दक्षता पथक आणि जिल्हा पुरवठा विभागाच्या संयुक्त कारवाईत पर्दाफाश झाला. या कारवाईत ८६ लाख ६५ हजार ४३२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणी एकूण सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई २९ जुलैच्या रात्री खामगाव-अकोला मार्गावरील सुदर्शन ढाब्याजवळील टेंभूर्णा शिवारात करण्यात आली. छाप्यामध्ये एका टँकरमधून एलपीजी गॅस काढून त्याची अवैधरित्या साठवणूक केली जात असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. प्राथमिक तपासात टँकरमधील गॅस व्यावसायिक वापराच्या सिलेंडरमध्ये भरून काळ्या बाजारात विक्रीसाठी तयार करण्यात येत असल्याचे उघड झाले.
कारवाईदरम्यान प्रशासनाने मोठ्या प्रमाणावर साहित्य जप्त केले. जप्त मुद्देमालामध्ये सुमारे १५ लाख ४९ हजार ६३२ रुपयांचा एलपीजी गॅस, ९ लाख रुपयांचा टँकर, टँकरमधील गॅस व संबंधित साहित्य, सुमारे ५ लाख ५२ हजार ६०० रुपयांचे साहित्य, २ लाख रुपयांची गॅस साठवणुकीची लोखंडी टाकी, ६० हजार रुपयांचे घरगुती वापराचे सिलेंडर तसेच इतर साहित्याचा समावेश असून, एकूण जप्तीची किंमत ८६ लाख ६५ हजार ४३२ रुपये असल्याची माहिती प्रशासनाने दिली.
या प्रकरणी जिल्हा पुरवठा अधिकारी रुपेश बिजेवर यांनी दिलेल्या तक्रारीवरून खामगाव ग्रामीण पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. जीवनावश्यक वस्तू अधिनियम, १९५५ तसेच लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस (रेग्युलेशन ऑफ सप्लाय अँड डिस्ट्रिब्युशन) ऑर्डर, २००० मधील संबंधित तरतुदींनुसार ही कारवाई करण्यात आली आहे.
या प्रकरणात टँकर चालक रवी ज्ञानेश्वर वाघभसे याला अटक करण्यात आली असून, टँकर चालक-मालक, अवैध गॅस व्यवसायाशी संबंधित व्यक्ती तसेच संबंधित जागेच्या मालकासह एकूण सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खामगाव ग्रामीण पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत असून, या अवैध गॅस चोरीच्या नेटवर्कमधील इतर संबंधितांचा शोध सुरू आहे.
