मा. श्री. नानासाहेब पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कोलते अभियांत्रिकी महाविद्यालयात भव्य रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न
मलकापूर: स्थानिक पद्मश्री डॉ. व्ही. बी. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालय, मलकापूर येथे लोकसेवा शिक्षण बहुउद्देशीय मंडळाचे अध्यक्ष माननीय श्री. डी. एन. पाटील साहेब उपाख्य नानासाहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भव्य रक्तदान शिबिराचे अत्यंत उत्साहात व यशस्वीरीत्या आयोजन 27 ऑगस्ट रोजी करण्यात आले. सदर शिबिर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग, रेड रिबन क्लब, मेडिकल सेल आणि जीवन ज्योती ब्लड बँक, मलकापूर यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडले. हा सामाजिक उपक्रम आयोजन उपाध्यक्ष श्री. प्रदीप कोलते, सचिव डॉ. अरविंद कोलते तसेच खजिनदार श्री. सुधीर पाचपांडे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले. त्यांनी अध्यक्ष नानासाहेब पाटील यांच्या समाजोपयोगी विचारांचा वारसा पुढे नेणाऱ्या या उपक्रमाचे मनःपूर्वक कौतुक केले व रक्तदात्यांना प्रोत्साहन दिले.
या शिबिराचे उद्घाटन व मार्गदर्शन करताना जीवन ज्योती ब्लड बँकेच्या संचालिका डॉ. जयश्री खर्चे यांनी विद्यार्थ्यांना रक्तदानाचे मानवी आरोग्यासाठी असलेले महत्त्व, रक्तदान केल्याने शरीरावर होणारे सकारात्मक फायदे आणि रक्तदानाविषयी समाजात असणारे गैरसमज दूर करत सविस्तर माहिती दिली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल खर्चे यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात “रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान असून युवकांनी सामाजिक बांधिलकी जपत नेहमी देश व समाजकार्यात अग्रभागी राहिले पाहिजे,” असा मोलाचा संदेश दिला. याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. युगेश खर्चे यांनीही विद्यार्थ्यांना सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी होण्याचे महत्त्व समजावून सांगितले, तसेच अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष समन्वयक प्राध्यापक रमाकांत चौधरी यांच्यासह आयक्यूएसी टीमने या विधायक कार्यक्रमाच्या आयोजनासाठी विशेष पुढाकार घेत मार्गदर्शन केले.
या शिबिरात महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थ्यांनी रांगेत उभे राहून अत्यंत उत्स्फूर्त आणि सक्रिय सहभाग नोंदवत रक्तदान केले. संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वी नियोजनासाठी आणि आयोजनासाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. सचिन बोरले, प्रा. ज्योती पाटील, प्रा. शारदा लांडे आणि प्रा. वैभव पाटील यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले; शेवटी रक्तदात्यांचे आभार मानून शिबिराची सांगता करण्यात आली.

