रेतीची चोरटी वाहतूक करणारे दोन टिप्पर पकडले; 60.30 लाखांचा मुद्देमाल जप्त
चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मलगी फाटा परिसरात विनापरवाना रेतीची चोरटी वाहतूक करणाऱ्या दोन टिप्पर वाहनांवर बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेने 6 सप्टेंबर 2026 रोजी मध्यरात्री कारवाई केली. या कारवाईत दोन टिप्पर आणि सहा ब्रास रेती असा एकूण 60 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्ह्यात विनापरवाना व अवैधरित्या गौण खनिज रेतीची वाहतूक करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेची स्वतंत्र पथके तयार करून अवैध रेती वाहतुकीवर लक्ष ठेवण्यात येत होते.
दरम्यान, 6 सप्टेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली की, चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मलगी फाटा परिसरातून काही जण टिप्परच्या माध्यमातून विनापरवाना रेतीची वाहतूक करीत आहेत. या माहितीच्या आधारे पथकाने मलगी फाटा येथे मध्यरात्री सापळा रचून रस्त्यावर नाकाबंदी केली. यावेळी दोन टिप्पर वाहनांमधून विनापरवाना व अवैधरित्या रेतीची वाहतूक होत असल्याचे आढळून आले.
या कारवाईत संदिप लिंबाजी देढे वय 29 वर्षे, रा. देऊळगाव मही, ता. देऊळगाव राजा आणि पवन देविदास मुरकुट वय 27 वर्षे, रा. डोरव्ही, ता. सिंदखेड राजा, जि. बुलढाणा या दोघांना ताब्यात घेण्यात आले.
पोलिसांनी टाटा कंपनीचा टिप्पर क्रमांक एमएच 28 बीबी 7556 किंमत अंदाजे 30 लाख रुपये, टाटा कंपनीचा टिप्पर क्रमांक एमएच 14 एमटी 4933 किंमत अंदाजे 30 लाख रुपये तसेच सहा ब्रास रेती किंमत अंदाजे 30 हजार रुपये असा एकूण 60 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक सुनील इंगळे यांच्या तक्रारीवरून चिखली पोलीस ठाण्यात दोन्ही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील कलम 303 (2) तसेच गौण खनिज अधिनियमातील कलम 21 (1) व 21 (2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास चिखली पोलीस ठाण्याच्या पथकाकडून सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या आदेशानुसार, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड व खामगावचे अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत ठाकरे यांच्या नेतृत्वात करण्यात आली. कारवाईत सहायक पोलीस निरीक्षक सुनील इंगळे, पोलीस हवालदार अनुपकुमार मेहेर, पोलीस कॉन्स्टेबल विक्रांत इंगळे, सतीश नाटेकर आणि चालक पोलीस कॉन्स्टेबल निवृत्ती पुंड यांचा सहभाग होता.

