जनता महाविद्यालयाच्या विजय रविंद्र हिवाळे याची थल सेना कॅम्प २०२६ साठी निवड
मलकापूर : जनता कला व वाणिज्य महाविद्यालय, मलकापूर येथील बी.ए. भाग-१चा विद्यार्थी व NCC कॅडेट विजय रविंद्र हिवाळे याची NCC मधील प्रतिष्ठेच्या महाराष्ट्र संचालनालयाच्या थल सेना कॅम्प (TSC) २०२६, दिल्ली येथे Obstacle (अडथळा) प्रकारासाठी निवड झाली आहे.
विजय हिवाळे हा १३ महाराष्ट्र बटालियन NCC, खामगाव अंतर्गत प्रशिक्षण घेत असून त्याने NCC ‘B’ Certificate परीक्षा उत्तीर्ण केली आहे. सामान्य कष्टकरी कुटुंबातून आलेल्या विजयने आपल्या मेहनत, शिस्त, जिद्द आणि सातत्यपूर्ण सरावाच्या जोरावर ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
थल सेना कॅम्प हा NCC मधील अत्यंत महत्त्वाच्या राष्ट्रीय स्तरावरील कॅम्पपैकी एक असून, दिल्ली येथे महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याची संधी विजयला मिळाली आहे. त्याच्या या यशामुळे जनता कला व वाणिज्य महाविद्यालय, मलकापूर तसेच १३ महाराष्ट्र बटालियन NCC, खामगाव यांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
विजयच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष नानासाहेब, सचिव डॉ.अरविंद कोलते, सर्व सन्माननीय सदस्य प्राचार्य, प्राध्यापकवर्ग, प्रशासकीयवर्ग NCC अधिकारी तसेच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी त्याचे अभिनंदन करून दिल्ली येथील AITSC मधील उत्कृष्ट सादरीकरणासाठी शुभेच्छा दिल्या.

