buldhana

बुलढाणा सामान्य रुग्णालयातून पळालेला आरोपी सहा तासांत जेरबंद; जळगाव जिल्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

बुलढाणा : वैद्यकीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात आणल्यानंतर टॉयलेटच्या खिडकीतून उडी मारून फरार झालेल्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या सहा तासांत जळगाव जिल्ह्यातील दिपनगर, भुसावळ परिसरातून ताब्यात घेतले. प्रतापसिंग सुरजसिंग बावरी, वय 20 वर्षे, रा. म्हाडा कॉलनी, मलकापूर, असे फरार आरोपीचे नाव असून, त्याला पळून जाण्यास मदत करणारा त्याचा भाऊ तुफानसिंग सुरजसिंग बावरी, वय 19 वर्षे, यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले.

पोलीस ठाणे एमआयडीसी मलकापूर येथे दाखल असलेल्या अपराध क्रमांक 109/2026 मधील कलम 303(2), 3(5) भारतीय न्याय संहितेच्या गुन्ह्यात प्रतापसिंग बावरी व कपूरसिंग सुरजसिंग बावरी हे आरोपी आहेत. 7 सप्टेंबर 2026 रोजी दोन्ही आरोपींना वैद्यकीय तपासणीसाठी बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात आले होते. यावेळी रात्री सुमारे 3 वाजता प्रतापसिंग बावरी याने रुग्णालयातील टॉयलेटच्या खिडकीतून उडी मारून पलायन केले.

घटनेची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी घटनास्थळी तात्काळ भेट देऊन शोधमोहीम सुरू केली. त्यांनी स्वतः शोधकार्यात सहभाग घेत शोध पथकांना मार्गदर्शन केले. स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने फरार आरोपी बुलढाण्यातून मलकापूरमार्गे भुसावळ शहराच्या दिशेने गेल्याचे निष्पन्न झाले.

त्यानंतर वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मलकापूरमार्गे जळगाव जिल्ह्यातील दिपनगर, भुसावळ येथे जाऊन सापळा रचला. या कारवाईत फरार आरोपी प्रतापसिंग बावरी याच्यासह त्याला पळून जाण्यास मदत करणारा त्याचा भाऊ तुफानसिंग बावरी यांना पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतले.

चौकशीदरम्यान आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेले दोन मोबाईल फोन आणि एक बजाज पल्सर मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे. दोन्ही आरोपींना पुढील कारवाईसाठी एमआयडीसी मलकापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

दरम्यान, रुग्णालयातून फरार झाल्याप्रकरणी प्रतापसिंग बावरी याच्याविरुद्ध बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक 849/2026, कलम 262 भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित गुन्ह्यांचा पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या आदेशानुसार, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड आणि अपर पोलीस अधीक्षक, खामगाव पियुष जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत ठाकरे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

कारवाईत पोलीस उपनिरीक्षक अविनाश जायभाये, पोलीस हेड कॉन्स्टेबल दिपक लेकुरवाळे, शेख चाँद, विजय पैठणे, गणेश पाटील, पोलीस कॉन्स्टेबल गजानन गोरले, निलेश राजपूत तसेच तांत्रिक विश्लेषण विभागातील पोलीस हेड कॉन्स्टेबल राजू आडवे आणि पोलीस कॉन्स्टेबल कैलास ठोंबरे यांचा सहभाग होता.

Zafar Khan

Zafar Khan Athar Khan is the Editor-in-Chief of Viral News Live, a daily newspaper covering news from Buldhana district and across Maharashtra. He is an active journalist committed to public interest reporting, focusing on local governance, crime news, social issues, and matters affecting the common people. He currently serves as the District President of Voice of Media (Urdu Wing) in Buldhana and works to strengthen responsible journalism and raise important public issues through independent media. Contact Information Email: zafar@viralnewslive.in Mobile: +91 9881850730

Leave a Reply