समृद्धी महामार्गावरील जबरी चोरीचा अवघ्या पाच तासांत छडा; चार आरोपी जेरबंद

बुलढाणा : समृद्धी महामार्गावर डोणगावजवळ ट्रक अडवून चालकास मारहाण करत ट्रक व त्यातील कांदा असा एकूण 36 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जबरीने लुटल्याच्या घटनेचा डोणगाव पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या पाच तासांत छडा लावला. या प्रकरणात चार आरोपींना जेरबंद करण्यात आले असून, चोरीस गेलेला ट्रक, कांदा तसेच गुन्ह्यात वापरलेली स्कोडा कार असा एकूण 41 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.
दि. 25 सप्टेंबर 2026 रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास फिर्यादी मिराज ऐजाज अहमद (वय 28, रा. थोन, तहसील सिराथु, जिल्हा कौसंबी, उत्तर प्रदेश) हे ट्रक क्रमांक CG-04-PP-9113 मध्ये कांदा भरून मेहकर ते मालेगाव मार्गे समृद्धी महामार्गावरून नागपूरकडे जात होते. डोणगावजवळ पांढऱ्या रंगाच्या MH-15-H-9004 क्रमांकाच्या कारमधून आलेल्या चार अनोळखी व्यक्तींनी त्यांचा ट्रक अडवला. त्यानंतर चालकास मारहाण करून ट्रक आणि त्यातील कांदा जबरदस्तीने घेऊन आरोपी पसार झाले.
या घटनेत 25 लाख रुपये किमतीचा ट्रक आणि 30 टन 560 किलो कांदा, असा एकूण 36 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला. फिर्यादीच्या तक्रारीवरून डोणगाव पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक 317/26 अन्वये भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
घटनेची गंभीर दखल घेत बुलढाणा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी गुन्ह्याची तातडीने उकल करून आरोपींचा शोध घेण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखा आणि डोणगाव पोलीस ठाण्याला दिले. त्यानुसार दोन्ही पथकांचे विशेष पथक तयार करून तपास सुरू करण्यात आला.
तपासादरम्यान समृद्धी महामार्गावरील विविध ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. फिर्यादीने दिलेले संशयितांचे वर्णन, गोपनीय माहिती, तांत्रिक विश्लेषण तसेच समृद्धी महामार्ग पोलिसांची मदत घेऊन पोलिसांनी गुन्ह्याचा माग काढला. त्यानंतर अवघ्या पाच तासांत चार संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले.
पोलिसांनी तेजस विलास ठोमसे (वय 20, रा. गोरठाण, ता. निफाड, जि. नाशिक), गौरव हरीभाऊ पानसरे (वय 29, रा. पातूर शेंबे, ता. चांदवड, जि. नाशिक), विश्वजित निवृत्ती ठोमसे (वय 30, रा. पंचकेश्वर, ता. निफाड, जि. नाशिक) आणि अशुदेव दास गोबिद दास (वय 32, रा. पश्चिम दांडीराहाट, जि. उत्तर 24 परगणा, पश्चिम बंगाल) यांना जेरबंद केले आहे.
आरोपींकडून 25 लाख रुपये किमतीचा ट्रक, 11 लाख 50 हजार रुपये किमतीचा 30 टन 560 किलो कांदा आणि 5 लाख रुपये किमतीची स्कोडा कार असा एकूण 41 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या आदेशान्वये अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड आणि अपर पोलीस अधीक्षक, खामगाव पियुष जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. डोणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश इंगोले, पोलीस उपनिरीक्षक प्रताप बाजड, पोलीस हवालदार शरदचंद्र गिरी, पुरुषोत्तम आघाव, युवराज राठोड, विलास भोसले तसेच पोलीस उपनिरीक्षक विजय अजमीरे, पोलीस कॉन्स्टेबल सहगल, पवन गाभणे, आनंद चोपडे, जाकिर चौधरी, अरुण सरदार, ज्ञानेश्वर घायाळ आणि तांत्रिक विभागातील पोलीस हवालदार राजू आडवे यांच्या पथकाने ही कारवाई केली. या कारवाईसाठी महामार्ग पोलिसांचीही मदत मिळाली.
या गुन्ह्याचा पुढील तपास डोणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश इंगोले करीत आहेत.

