Mumbai

भगवान बिरसा मुंडा : आदिवासी हक्कांसाठी इंग्रजांविरुद्ध लढणारे क्रांतिकारी जननायक

१५ नोव्हेंबरला १५१ वी जयंती; राज्यभर ११ ते १८ नोव्हेंबरदरम्यान गौरव दिवस सेवा सप्ताहाचे आयोजन

मुंबई : विशेष प्रतिनिधी

आदिवासी समाजाचे हक्क, जल, जंगल आणि जमीन यांच्या संरक्षणासाठी ब्रिटिश सत्तेविरुद्ध क्रांतिकारी लढा उभारणारे भगवान बिरसा मुंडा यांची १५१ वी जयंती १५ नोव्हेंबर २०२६ रोजी देशभरात जनजातीय गौरव दिवस म्हणून साजरी करण्यात येणार आहे. या निमित्ताने महाराष्ट्र शासनाच्या वतीने ११ ते १८ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत राज्यभर भगवान बिरसा मुंडा गौरव दिवस सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून, या सप्ताहादरम्यान आदिवासी समाजाच्या कल्याणासाठी विविध जनहितकारी उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

भगवान बिरसा मुंडा यांना देशभरातील आदिवासी समाजात अत्यंत आदराचे स्थान आहे. आदिवासी समाजाच्या विकासासाठी, पारंपरिक हक्कांच्या संरक्षणासाठी आणि ब्रिटिशांच्या अन्यायकारक धोरणांविरुद्ध त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला. अल्पायुष्यात त्यांनी केलेले कार्य आणि आदिवासी समाजाला संघटित करण्यासाठी दिलेले योगदान भारतीय इतिहासात महत्त्वपूर्ण मानले जाते.

बिरसा मुंडा यांचा जन्म १५ नोव्हेंबर १८७५ रोजी तत्कालीन रांची जिल्ह्यातील आणि सध्याच्या झारखंडमधील खुंटी जिल्ह्यात असलेल्या उलिहातू गावात आदिवासी कुटुंबात झाला. त्यांचे वडील सुगना मुंडा आणि आई कर्मी मुंडा होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण मिशनरी शाळेत झाले. ब्रिटिश राजवटीतील अत्याचार, आदिवासींच्या जमिनी बळकावण्याचे प्रकार आणि स्थानिक जमीनदारांकडून होणारे शोषण पाहून त्यांनी लहान वयातच अन्यायाविरुद्ध संघर्ष करण्याचा निर्धार केला.

आदिवासी हक्कांसाठी उलगुलानचा लढा

वयाच्या अवघ्या २५ वर्षांत बिरसा मुंडा यांनी ब्रिटिश सत्तेविरुद्ध मोठे जनआंदोलन उभे केले. ब्रिटिश अधिकारी आणि स्थानिक जमीनदारांकडून आदिवासींच्या जमिनी बळकावल्या जात होत्या. त्यांच्यावर अन्याय आणि अत्याचार केले जात होते. या शोषणाविरोधात बिरसा मुंडा यांनी आदिवासी समाजाला संघटित करून हक्कांसाठी लढण्याचे आवाहन केले.

‘धरती आबा’ या नावाने ओळखले जाणारे बिरसा मुंडा यांनी १८९० च्या दशकात ब्रिटिश सत्तेविरुद्ध ‘उलगुलान’ अर्थात मुंडा बंडाचे नेतृत्व केले. हा लढा केवळ ब्रिटिश सत्तेविरुद्धचा संघर्ष नव्हता, तर आदिवासींच्या जमिनीवरील अधिकार, सांस्कृतिक अस्मिता, परंपरा आणि सामाजिक न्यायाच्या संरक्षणासाठी उभारलेली चळवळ होती. त्यांच्या नेतृत्वामुळे आदिवासी समाजात स्वाभिमान आणि एकजुटीची भावना अधिक बळकट झाली.

सामाजिक सुधारणांसह रुग्णसेवेचे कार्य

बिरसा मुंडा हे केवळ क्रांतिकारी लढवय्ये नव्हते, तर समाजसेवक आणि सुधारणावादी नेतेही होते. आजारी व्यक्तींना मदत करणे आणि त्यांच्यावर उपचार करणे हे त्यांच्या कार्यातील महत्त्वाचे अंग होते. दुष्काळ आणि महामारीच्या काळात त्यांनी गावोगावी जाऊन गरजू आणि आजारी लोकांची सेवा केली. त्यांच्या सेवाभावी वृत्तीमुळे आदिवासी समाजात त्यांच्याविषयी मोठा विश्वास निर्माण झाला होता.

ब्रिटिशांकडून अटक आणि तुरुंगवास

ब्रिटिश सत्तेविरुद्ध बिरसा मुंडा यांचा वाढता प्रभाव पाहून इंग्रज सरकारने त्यांच्यावर कारवाई केली. १८९५ मध्ये त्यांना अटक करून हजारीबाग तुरुंगात पाठविण्यात आले. सुमारे दोन वर्षांच्या तुरुंगवासानंतर १८९७ ते १९०० या काळात ब्रिटिश आणि मुंडा आदिवासी यांच्यात अनेक संघर्ष झाले.

ऑगस्ट १८९७ मध्ये खुंटी येथे बिरसा मुंडा आणि त्यांच्या सुमारे ४०० सहकाऱ्यांनी धनुष्यबाणांच्या साहाय्याने ब्रिटिशांच्या पोलीस ठाण्यावर हल्ला केला. त्यानंतर १८९८ मध्ये टांगा नदीच्या परिसरात ब्रिटिश सैन्य आणि मुंडा आदिवासी यांच्यात मोठा संघर्ष झाला. ब्रिटिशांनी या आंदोलनाचा बदला घेण्यासाठी अनेक आदिवासी नेत्यांना अटक केली. १९०० मध्ये डोंबाडी टेकडीवर झालेल्या संघर्षात महिला आणि लहान मुलांसह अनेक आदिवासींना प्राण गमवावे लागले.

रांची तुरुंगात घेतला अखेरचा श्वास

ब्रिटिश सत्तेविरुद्धचा संघर्ष तीव्र झाल्यानंतर फेब्रुवारी १९०० मध्ये बिरसा मुंडा यांना चक्रधरपूर येथून अटक करून रांची तुरुंगात ठेवण्यात आले. ९ जून १९०० रोजी त्यांचे रांची तुरुंगात निधन झाले. ब्रिटिश सरकारने त्यांच्या मृत्यूचे कारण कॉलरा असल्याचे सांगितले होते. मात्र, त्यांच्या मृत्यूच्या कारणाबाबत त्यावेळीही शंका व्यक्त करण्यात आल्या होत्या. अवघ्या २५ वर्षांच्या आयुष्यात त्यांनी आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी दिलेला लढा इतिहासात अजरामर झाला.

अंधश्रद्धा आणि व्यसनमुक्तीसाठी जनजागृती

बिरसा मुंडा यांनी आदिवासी समाजात सामाजिक सुधारणांवर विशेष भर दिला. त्यांनी अंधश्रद्धा, व्यसनाधीनता आणि मद्यपानाच्या विरोधात जनजागृती केली. पशू-पक्ष्यांबद्दल दया आणि सहानुभूती बाळगण्याचा संदेश देत त्यांनी प्राण्यांची बळी देण्याच्या प्रथेलाही विरोध केला. समाजातील एकता, स्वच्छ विचार आणि नैतिक मूल्यांचे महत्त्व त्यांनी लोकांना पटवून दिले. त्यांच्या विचारधारेचे अनुकरण करणाऱ्या अनुयायांना ‘बिरसाईत’ म्हणून ओळखले जाते.

झारखंडसह बिहार, ओडिशा, छत्तीसगड आणि पश्चिम बंगालमधील आदिवासी भागांतही बिरसा मुंडा यांना श्रद्धेने स्मरण केले जाते. रांची येथील कोकर परिसरातील त्यांच्या समाधीस्थळी दरवर्षी हजारो अनुयायी अभिवादन करण्यासाठी येतात.

१५ नोव्हेंबर जनजातीय गौरव दिवस

आदिवासी स्वातंत्र्यसैनिकांचे योगदान, संस्कृती, परंपरा, भाषा आणि सामाजिक अस्मिता यांचे जतन व संवर्धन करण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाने १५ नोव्हेंबर हा दिवस जनजातीय गौरव दिवस म्हणून घोषित केला आहे. आदिवासी समाजाने ब्रिटिश राजवटीविरुद्ध केलेल्या संघर्षाची आणि दिलेल्या बलिदानाची आठवण नव्या पिढीला करून देणे हा या दिवसामागील प्रमुख उद्देश आहे.

राज्यभर ११ ते १८ नोव्हेंबरदरम्यान सेवा सप्ताह

भगवान बिरसा मुंडा गौरव दिवस सेवा सप्ताहानिमित्त ११ ते १८ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत राज्यभर विविध जनकल्याणकारी उपक्रम राबविण्यात येणार आहेत. या माध्यमातून आदिवासी बांधवांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे, विविध शासकीय सेवा सुलभ करणे तसेच त्यांचे शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक आणि आरोग्यविषयक सक्षमीकरण करण्यावर भर देण्यात येणार आहे. पात्र लाभार्थ्यांपर्यंत विविध योजनांचे लाभ आणि शासकीय सेवा पोहोचविण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत.

भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त १५ नोव्हेंबर २०२६ रोजी महाराष्ट्रातील गडचिरोली येथे देशस्तरीय मुख्य शासकीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी दूरदृश्य प्रणालीद्वारे मार्गदर्शन करणार आहेत. राज्यपाल, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, आदिवासी विकास मंत्री यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

याशिवाय राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये आणि अनुसूचित जमातीबहुल तालुक्यांच्या मुख्यालयांमध्ये भगवान बिरसा मुंडा तसेच अन्य आदिवासी महापुरुषांच्या प्रतिमांना अभिवादन करण्यात येणार आहे. पद्म पुरस्कारप्राप्त आदिवासी व्यक्ती, सामाजिक कार्यकर्ते, समाजसेवक, बुद्धिजीवी, आदिवासी संत-महंत आणि विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्ती व समूहांचा सन्मान करण्यात येणार आहे. आदिवासी महापुरुषांच्या नावाने उद्याने, चौक आणि रस्त्यांचे नामकरण तसेच ऐतिहासिक वारशाच्या जतनासाठी विविध उपक्रमही राबविण्यात येणार आहेत.

भगवान बिरसा मुंडा यांचे शौर्य, नेतृत्व आणि आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी केलेला संघर्ष आजही प्रेरणादायी आहे. दीर्घकाळ दुर्लक्षित राहिलेल्या आदिवासी स्वातंत्र्यसैनिकांच्या इतिहासाला राष्ट्रीय स्तरावर योग्य स्थान मिळावे आणि त्यांच्या योगदानाची जाणीव नव्या पिढीला व्हावी, या दृष्टीने जनजातीय गौरव दिवस महत्त्वपूर्ण ठरत आहे. मातृभूमी, समाज आणि आपल्या हक्कांसाठी त्यांनी केलेला संघर्ष भारतीय इतिहासातील प्रेरणादायी अध्याय म्हणून सदैव स्मरणात राहील.

Zafar Khan

Zafar Khan Athar Khan is the Editor-in-Chief of Viral News Live, a daily newspaper covering news from Buldhana district and across Maharashtra. He is an active journalist committed to public interest reporting, focusing on local governance, crime news, social issues, and matters affecting the common people. He currently serves as the District President of Voice of Media (Urdu Wing) in Buldhana and works to strengthen responsible journalism and raise important public issues through independent media. Contact Information Email: zafar@viralnewslive.in Mobile: +91 9881850730

Zafar Khan has 233 posts and counting. See all posts by Zafar Khan

Leave a Reply