Mumbai

अंगणवाडी व आशा कर्मचाऱ्यांचे आझाद मैदानावर आंदोलन, सहाय्यक बीएलओची सक्ती रद्द करण्याची मागणी

मुंबई : सहाय्यक बीएलओ म्हणून अतिरिक्त काम करण्याच्या सक्तीविरोधात महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती आणि महाराष्ट्र राज्य आशा व गटप्रवर्तक कृती समितीच्या वतीने मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करण्यात आले. अंगणवाडी व आशा कर्मचाऱ्यांवर लादण्यात आलेली अतिरिक्त जबाबदारी तातडीने मागे घ्यावी, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला.

आंदोलनादरम्यान कृती समितीने सांगितले की, एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत मानधनावर कार्यरत असलेल्या अंगणवाडी सेविकांवर पूर्वप्राथमिक शिक्षण, बालकांचे पोषण व आरोग्य, वजन व उंची मोजणी, विविध सर्वेक्षणे, नवजात बालके व गर्भवती महिलांची नोंद, लसीकरण, गृहभेटी, टीएचआर वितरण तसेच मातृत्व वंदना योजनेसह अनेक जबाबदाऱ्या आधीपासूनच आहेत. अशा परिस्थितीत त्यांच्यावर सहाय्यक बीएलओचे अतिरिक्त काम लादणे अन्यायकारक असल्याचा आरोप करण्यात आला.

कृती समितीच्या प्रतिनिधींनी दावा केला की, अतिरिक्त काम करण्यास नकार दिल्यास सेवा समाप्ती किंवा प्रशासकीय कारवाईची धमकी दिली जात असून त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. महिला व बालविकास विभागाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांना योजनाबाह्य कामे देऊ नयेत, अशी भूमिका यापूर्वी स्पष्ट केली असल्याचेही आंदोलकांनी नमूद केले. तसेच सर्वोच्च न्यायालयानेही कर्मचाऱ्यांच्या मूळ कामावर परिणाम करणारी अतिरिक्त कामे देण्याबाबत गंभीर निरीक्षणे नोंदविल्याची आठवण करून देण्यात आली.

यावेळी आशा सेविकांवर बीएलओचे पूर्णवेळ स्वरूपाचे काम लादू नये, अशी मागणी करण्यात आली. बीएलओच्या कामासाठी शासनाने स्वतंत्र यंत्रणा उभारून बेरोजगार सुशिक्षित युवक-युवतींची नियुक्ती करावी, अशी मागणीही कृती समितीने शासनाकडे केली.

Zafar Khan

Zafar Khan Athar Khan is the Editor-in-Chief of Viral News Live, a daily newspaper covering news from Buldhana district and across Maharashtra. He is an active journalist committed to public interest reporting, focusing on local governance, crime news, social issues, and matters affecting the common people. He currently serves as the District President of Voice of Media (Urdu Wing) in Buldhana and works to strengthen responsible journalism and raise important public issues through independent media. Contact Information Email: zafar@viralnewslive.in Mobile: +91 9881850730