Mumbai

नवी मुंबईत अभिजात मराठी भाषा सप्ताहाची उत्साहात सुरुवात

डॉ. संजय उपाध्ये यांचा ‘मातृभाषा आणि मनःशांती’ विषयावर संवादात्मक कार्यक्रम; मराठीच्या संवर्धनासाठी वैयक्तिक आणि सामूहिक प्रयत्नांची गरज

नवी मुंबई : अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्त नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने विविध उपक्रमांना आज उत्साहपूर्ण वातावरणात सुरुवात करण्यात आली. प्रसिद्ध व्याख्याते डॉ. संजय उपाध्ये यांच्या ‘मातृभाषा आणि मनःशांती’ या विषयावरील संवादात्मक कार्यक्रमाने सप्ताहाचा प्रारंभ झाला. कार्यक्रमाला महानगरपालिका अधिकारी, कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने रसिक नागरिकांची उपस्थिती लाभली.

या प्रसंगी नवी मुंबईच्या महापौर सुजाता पाटील, उपमहापौर दशरथ भगत, महानगरपालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे, अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

मार्गदर्शन करताना डॉ. संजय उपाध्ये यांनी मराठी भाषेचा प्रभावी वापर, संवर्धन आणि विकास ही केवळ शासन किंवा संस्थांची जबाबदारी नसून प्रत्येक मराठी भाषिकाची जबाबदारी असल्याचे स्पष्ट केले. आपल्या मातृभाषेबद्दल मनापासून अभिमान निर्माण होणे आणि दैनंदिन व्यवहारात मराठीचा जाणीवपूर्वक वापर होणे आवश्यक आहे. आपण स्वतः भाषेचा वापर किती करतो, याचा विचार न करता केवळ इतरांना दोष देण्यात अर्थ नसल्याचे त्यांनी सांगितले.

अभिजात मराठी भाषा सप्ताह साजरा करताना केवळ कार्यक्रमांचे आयोजन करण्यापेक्षा आपण प्रत्यक्षात मराठी भाषेसाठी काय योगदान देत आहोत, याचा प्रत्येकाने अंतर्मुख होऊन विचार करावा, असे आवाहन डॉ. उपाध्ये यांनी केले. दैनंदिन जीवनातील संवाद, विनोद, कविता आणि विविध कलात्मक माध्यमांद्वारे मराठी भाषा सहज आणि आनंददायी पद्धतीने जपता येते. भाषेचा वापर हा ओझे न बनता आपल्या जगण्याचा नैसर्गिक भाग झाला पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने तिच्या समृद्ध परंपरेचा आणि ऐतिहासिक वारशाचा गौरव झाला आहे. मात्र, या गौरवाला कृतीची जोड देणे आवश्यक असून, नव्या पिढीपर्यंत मराठी भाषेची समृद्ध परंपरा पोहोचविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे गरजेचे आहे, असा संदेश कार्यक्रमातून देण्यात आला.

यावेळी बोलताना महानगरपालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी मराठी भाषेच्या संवर्धनासाठी प्रत्येकाने आपल्या पातळीवर योगदान देण्याची गरज व्यक्त केली. आपण सर्वांनी वैयक्तिक तसेच सामूहिक पातळीवर प्रयत्न केल्यास मराठी भाषेला अधिक उत्तुंग शिखरावर नेणे शक्य आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

अभिजात मराठी भाषा सप्ताहाच्या निमित्ताने नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने विविध भाषाविषयक आणि सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, नागरिकांनी या उपक्रमांमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Zafar Khan

Zafar Khan Athar Khan is the Editor-in-Chief of Viral News Live, a daily newspaper covering news from Buldhana district and across Maharashtra. He is an active journalist committed to public interest reporting, focusing on local governance, crime news, social issues, and matters affecting the common people. He currently serves as the District President of Voice of Media (Urdu Wing) in Buldhana and works to strengthen responsible journalism and raise important public issues through independent media. Contact Information Email: zafar@viralnewslive.in Mobile: +91 9881850730

Zafar Khan has 215 posts and counting. See all posts by Zafar Khan

Leave a Reply