jalgaon

उर्दू साहित्य, काव्य आणि पत्रकारितेतील मान्यवरांचा अल-फैज फाऊंडेशनतर्फे गौरव

कय्यूम अथवार, रईस फैजपुरी, रागिब ब्यावली आणि सलाहुद्दीन अदीब यांना मानाचे पुरस्कार प्रदान; जळगावात चौथा वार्षिक उर्दू साहित्य पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न

जळगाव : उर्दू भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नसून ती संस्कृती, चारित्र्य, प्रेम आणि आपुलकीचे प्रतीक आहे. या भाषेचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी केवळ भावना व्यक्त करून चालणार नाही, तर नियोजनबद्ध, जागरूक आणि प्रामाणिक प्रयत्नांची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध पत्रकार, कवी तथा विचारवंत डॉ. मेहताब आलम (भोपाळ) यांनी केले. अल-फैज फाऊंडेशन, जळगावच्या ‘बज्मे उर्दू अदब’तर्फे आयोजित चौथा वार्षिक उर्दू साहित्य पुरस्कार वितरण सोहळा के. के. मोतीवाला हॉल येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. अब्दुल करीम सालार होते.

खान्देशातील साहित्य, काव्य, कथा आणि पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांना यावेळी विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. सन २०२५ चा ‘सैफ भासावली काव्य पुरस्कार’ रईस फैजपुरी, ‘फारूक आझमी कथा व काव्य पुरस्कार’ कय्यूम अथवार, ‘ईमान ब्यावली पुरस्कार’ रागिब ब्यावली, तर ‘शम्स एजाज पत्रकारिता पुरस्कार’ सलाहुद्दीन अदीब यांना प्रदान करण्यात आला. प्रत्येक पुरस्कारामध्ये स्मृतिचिन्ह, प्रशस्तिपत्र, शाल आणि ११ हजार रुपये रोख रक्कम देऊन गौरव करण्यात आला.

युवा साहित्यिकांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने युवा स्तंभलेखक उसैद अशहर आणि आतिफ अदनान यांना ‘उदयोन्मुख प्रतिभा पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. त्यांच्या साहित्यिक योगदानाची दखल घेत आयोजकांनी त्यांचा विशेष सन्मान केला.

या सोहळ्यात उर्दू मातृभाषा नसतानाही या भाषेच्या प्रचार, प्रसार आणि संवर्धनासाठी निष्ठेने कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव हे विशेष आकर्षण ठरले. डॉ. महेंद्र कुमार पगारे, डॉ. मूलचंद उदासी आणि उर्दू विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलेले सुनील कुमार हसवानी यांना ‘उर्दू प्रेमी पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच डॉ. मेहताब आलम, उर्दू कारवाँ मुंबईचे अध्यक्ष फरीद अहमद खान आणि प्रसिद्ध सूत्रसंचालक हारून उस्मानी यांना ‘निशाने अलफैज पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.

कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून अब्दुल मजीद झकारिया, इजाज मलिक, मुफ्ती हारून नदवी, अकील इस्माईल, जफर शेख आणि डॉ. गयास उस्मानी उपस्थित होते. यावेळी मुफ्ती मुहम्मद हारून नदवी यांनी उर्दू भाषेच्या संवर्धनासाठी प्रामाणिक आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांची गरज व्यक्त केली.

ज्येष्ठ पत्रकार मुश्ताक करीमी यांनी आपल्या भाषणातून उर्दू भाषेतील कालबाह्य होत चाललेल्या शब्दांचे पुनरुज्जीवन आणि शब्दांच्या अचूक उच्चारांवर काम करण्याची आवश्यकता अधोरेखित केली. उर्दू भाषेचा खऱ्या अर्थाने विकास करायचा असेल, तर केवळ तिच्या पानांना नव्हे, तर तिच्या मुळांना पाणी घालावे लागेल. यासाठी शिक्षक आणि पालकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

उर्दू कारवाँ मुंबईचे अध्यक्ष फरीद अहमद खान यांनी उर्दू भाषिक नसलेल्या व्यक्तींनाही उर्दूच्या सेवेसाठी पुरस्कार देण्याच्या उपक्रमाचे कौतुक केले. हा उपक्रम उर्दू भाषेच्या गंगा-जमुनी तहजीब आणि सर्वसमावेशक संस्कृतीची जिवंत साक्ष असल्याचे त्यांनी नमूद केले.

अध्यक्षीय भाषणात डॉ. अब्दुल करीम सालार यांनी उर्दू भाषेच्या प्रचार आणि प्रसारासाठी सुरू असलेल्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला. त्यांनी स्वतः संकलित केलेल्या ‘उर्दू के बेलौस सिपाही’ या पुस्तकाचा उल्लेख केला. तसेच जळगाव जिल्ह्यातील हयात असलेल्या लेखकांच्या साहित्यिक योगदानाचा परिचय करून देणाऱ्या एका विस्तृत पुस्तकाच्या प्रकाशनाचे काम सुरू असल्याची महत्त्वपूर्ण माहिती त्यांनी दिली.

कार्यक्रमाच्या प्रारंभी अजीज सालार, मुश्ताक सालार, आसिफ पठाण, जाहिद सर आणि जुबेर खान यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. पुरस्कारप्राप्त साहित्यिकांनीही आपल्या भावना व्यक्त करत आयोजकांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साबीर मुस्तफाबादी, प्राचार्य वकार शेख आणि इफ्तेखार गुलाम रसूल यांनी केले.

या सोहळ्याला जिल्हाभरातील साहित्यिक, कवी, लेखक, पत्रकार, शिक्षणतज्ज्ञ आणि उर्दूप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. खान्देशच्या साहित्यिक परंपरेचा सन्मान, उर्दू भाषेच्या संवर्धनाचा संकल्प आणि नव्या पिढीतील साहित्यिक प्रतिभेला प्रोत्साहन देणारा हा पुरस्कार सोहळा जळगावच्या साहित्यिक वर्तुळात विशेष महत्त्वाचा ठरला.

Tags: अल-फैज फाऊंडेशन, उर्दू साहित्य, जळगाव, खान्देश, साहित्य पुरस्कार, उर्दू भाषा, साहित्यिक गौरव, पत्रकारिता पुरस्कार

Zafar Khan

Zafar Khan Athar Khan is the Editor-in-Chief of Viral News Live, a daily newspaper covering news from Buldhana district and across Maharashtra. He is an active journalist committed to public interest reporting, focusing on local governance, crime news, social issues, and matters affecting the common people. He currently serves as the District President of Voice of Media (Urdu Wing) in Buldhana and works to strengthen responsible journalism and raise important public issues through independent media. Contact Information Email: zafar@viralnewslive.in Mobile: +91 9881850730

Leave a Reply