Buldhana News

बुलढाणा येथे नवीन आधार सेवा केंद्र सुरू; नागरिकांना सातही दिवस सेवा उपलब्ध

५ ते १७ वर्षे वयोगटातील मुलांचे अनिवार्य बायोमेट्रिक अपडेट मोफत

बुलढाणा, दि. 19 (जिमाका) : भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाच्या (UIDAI) मुंबई प्रादेशिक कार्यालयातर्फे बुलढाणा येथे सुरू करण्यात आलेल्या नवीन आधार सेवा केंद्राचे उद्घाटन आमदार संजय गायकवाड यांच्या हस्ते आज करण्यात आले. या केंद्रामुळे जिल्ह्यातील नागरिकांना जलद, सोयीस्कर व पारदर्शक आधार सेवा उपलब्ध होणार असून, नागरिकांनी या केंद्राचा लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार श्री. गायकवाड यांनी केले.

आधारमधील माहिती अद्ययावत नसल्यामुळे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, शासकीय योजना, शैक्षणिक प्रवेश तसेच बँकिंग व आधार आधारित सेवांचा लाभ घेताना अडचणी येतात. अनेकदा बायोमेट्रिक माहिती अद्ययावत नसल्यामुळे लाभार्थी शासकीय योजनांपासून वंचित राहण्याची शक्यता असते. ही अडचण दूर करण्यासाठी बुलढाणा येथे आधार सेवा केंद्र सुरू करण्यात आले आहे.

या केंद्रात ५ ते १७ वर्षे वयोगटातील मुलांसाठी अनिवार्य बायोमेट्रिक अपडेट मोफत करण्यात येणार आहे. यासोबतच आधार नोंदणी, जनसांख्यिकीय माहितीतील दुरुस्ती आणि तक्रार निवारणाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांसह नागरिकांनी आधारमधील माहिती वेळेत अद्ययावत करून घ्यावी, असे आवाहन आमदार संजय गायकवाड यांनी केले. यावेळी त्यांनी स्वत: आधार बायोमेट्रीक अपडेट करुन घेतले.

हे आधार सेवा केंद्र डीएसडी सिटी मॉल, इंडियन बँकेजवळ, तहसील रोड, चैतन्यवाडी, बुलढाणा येथे सुरू करण्यात आले आहे. केंद्र आठवड्यातील सातही दिवस सकाळी ९.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत नागरिकांच्या सेवेत राहणार आहे.

केंद्रामध्ये आधुनिक सुविधा, व्हीलचेअर प्रवेश, सुलभ स्वच्छतागृह आणि सेवा वितरणासाठी स्वतंत्र व्यवस्थापकाची नियुक्ती करण्यात आली आहे. नागरिकांना केंद्रातच तक्रारींचे निराकरण करण्याची सुविधाही उपलब्ध राहणार आहे.

नागरिकांना आधार सेवा केंद्रासाठी UIDAI च्या अपॉइंटमेंट पोर्टल वर पूर्वनोंदणी करता येणार आहे. तसेच भुवन आधार पोर्टल वर आधार सेवा केंद्रांचे भौगोलिक स्थान उपलब्ध आहे. शाळांमध्येही पुढील पिढीची डिजिटल ओळख सुरक्षित व अद्ययावत करण्यासाठी विशेष बायोमेट्रिक अपडेट शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे.

यावेळी आधार सेवा केंद्र व्यवस्थापक रवी पवार, UIDAI व्यवस्थापक महेश शिंदे, प्रोटीयन व्यवस्थापक विजय ढोरे, ऑपरेशन मॅनेजर मंगेश शेळके तसेच प्रोटीयन ई-गव्ह टेक्नॉलॉजीज लिमिटेडचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Zafar Khan

Zafar Khan Athar Khan is the Editor-in-Chief of Viral News Live, a daily newspaper covering news from Buldhana district and across Maharashtra. He is an active journalist committed to public interest reporting, focusing on local governance, crime news, social issues, and matters affecting the common people. He currently serves as the District President of Voice of Media (Urdu Wing) in Buldhana and works to strengthen responsible journalism and raise important public issues through independent media. Contact Information Email: zafar@viralnewslive.in Mobile: +91 9881850730

Leave a Reply