Malkapur News

बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त शिवसेनेचा जनता दरबार; शेतकरी व नागरिकांच्या प्रश्नांसाठी दीपक चांभारे पाटील यांची शासकीय कार्यालयांवर धडक

मलकापूर : शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने मलकापूर येथे जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे मलकापूर तालुकाप्रमुख दीपक चांभारे पाटील यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी शासकीय विश्रामगृहात बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर तालुक्यातील शेतकरी, शेतमजूर आणि सर्वसामान्य नागरिकांच्या विविध समस्या जाणून घेत संबंधित शासकीय कार्यालयांना भेटी देऊन अधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्यात आले.

या जनता दरबारात शेतकऱ्यांना मिळणाऱ्या पाच हजार रुपयांच्या अनुदानाचा प्रश्न प्रामुख्याने उपस्थित करण्यात आला. वाघोलीसह मलकापूर तालुक्यातील अनेक पात्र शेतकऱ्यांना अद्याप हे अनुदान मिळाले नसल्याची बाब पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. तसेच शासनाकडून कर्जमाफी जाहीर होऊनही अनेक शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवरील कर्जाच्या नोंदी अद्याप अद्ययावत झालेल्या नसल्याने नवीन पीककर्ज घेताना अडचणी निर्माण होत असल्याचे सांगण्यात आले. यासंदर्भात बँकनिहाय माहिती घेऊन प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची मागणी करण्यात आली.

महावितरण विभागाच्या कामकाजाबाबतही पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. वाघुड, देवधाबा, माकनेर यांसह विविध गावांमधील रोहित्रांच्या समस्या, ग्रामीण भागातील खंडित वीजपुरवठा तसेच शेतातील विद्युत तारांच्या चोरीमुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले. खराब रोहित्रांची तातडीने दुरुस्ती करावी, चोरी झालेल्या विद्युत तारांची पुनर्स्थापना करावी आणि ग्रामीण भागात नियमित वीजपुरवठा सुरू ठेवावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

मलकापूर तहसील कार्यालयातील प्रलंबित महसुली प्रकरणांचाही मुद्दा जनता दरबारात उपस्थित करण्यात आला. विविध कामांसाठी नागरिकांना वारंवार शासकीय कार्यालयांच्या फेऱ्या माराव्या लागत असून अनेक प्रकरणांचा वेळेत निपटारा होत नसल्याने शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. तहसील कार्यालयातील प्रलंबित प्रकरणांचा आढावा घेऊन नियमानुसार तातडीने निपटारा करावा, अशी मागणी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे करण्यात आली.

जनता दरबार हा केवळ नागरिकांच्या तक्रारी ऐकण्यापुरता मर्यादित नसून त्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करण्याचा उपक्रम असल्याची भूमिका शिवसेना पदाधिकाऱ्यांनी मांडली. नागरिकांना आपल्या कामांसाठी वारंवार शासकीय कार्यालयांत जावे लागू नये, प्रत्येकाच्या तक्रारीची गांभीर्याने दखल घेऊन प्रशासनाने जबाबदारीने काम करावे, अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली.

या उपक्रमात शिवसेना मलकापूर तालुकाप्रमुख दीपक चांभारे पाटील, शहरप्रमुख हरिदास गणबास, रामभाऊ थोरबोले, मधुभाऊ इंगळे, अॅड. बळीराम वनारे, अक्षय रायपुरे, बाळूभाऊ ठाकरे, बाळकृष्ण डिके, अनिल तायडे, पंढरी वानखडे, राजीव राजपूत, सुरेश दांडगे, गोपाल घाटे, गजानन गावंडे, निलेश तायडे, राजेंद्र देशमुख, चक्रधर संबारे, रामभाऊ शिंदे, संदीप खडसने, हरिदास शिंदे, नासिर खान, आसिम शेख, रफिक पजायवाला, डिंगबर सनीनसे, पूनमचंद करांगळे, इसाकभाई तेली, रोहिदास माळी आणि नंदू परसे यांच्यासह शिवसैनिक व नागरिक उपस्थित होते.

शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सुटेपर्यंत प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरूच ठेवण्यात येईल, असा निर्धार यावेळी दीपक चांभारे पाटील यांनी व्यक्त केला. जनतेचा प्रश्न हाच शिवसेनेचा प्रश्न असून नागरिकांच्या हक्कांसाठी संघर्ष सुरूच राहील, अशी भूमिका त्यांनी मांडली.

एक कॉल, प्रॉब्लेम सॉल्व्ह! या भूमिकेतून जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी शिवसेना कटिबद्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Zafar Khan

Zafar Khan Athar Khan is the Editor-in-Chief of Viral News Live, a daily newspaper covering news from Buldhana district and across Maharashtra. He is an active journalist committed to public interest reporting, focusing on local governance, crime news, social issues, and matters affecting the common people. He currently serves as the District President of Voice of Media (Urdu Wing) in Buldhana and works to strengthen responsible journalism and raise important public issues through independent media. Contact Information Email: zafar@viralnewslive.in Mobile: +91 9881850730

Leave a Reply