नांदुरा तालुक्यात ७ हजार रेशनकार्डे बंद; समाजवादी पार्टी आक्रमक
आझाद पठाण यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदारांना निवेदन; पात्र लाभार्थ्यांचे रेशन तात्काळ सुरू करण्याची मागणी
नांदुरा : शासनाच्या मिशन सुधार अभियानांतर्गत नांदुरा तालुक्यात सुमारे ७ हजार रेशनकार्डे बंद करण्यात आल्याचा मुद्दा ऐरणीवर आला असून, या निर्णयाविरोधात समाजवादी पार्टीने आक्रमक भूमिका घेतली आहे. समाजवादी पार्टीचे युवा जिल्हाध्यक्ष आझाद पठाण यांच्या नेतृत्वाखाली १७ नोव्हेंबर रोजी तहसीलदारांना निवेदन सादर करून बंद करण्यात आलेली पात्र लाभार्थ्यांची रेशनकार्डे तात्काळ पूर्ववत करावीत आणि त्यांना नियमित धान्य वितरण सुरू करावे, अशी मागणी करण्यात आली.
ई-केवायसी प्रक्रिया अपूर्ण राहणे किंवा तांत्रिक त्रुटी यांसारख्या कारणांमुळे कोणत्याही पात्र गरीब कुटुंबाला शासकीय धान्यापासून वंचित ठेवू नये, अशी भूमिका निवेदनातून मांडण्यात आली. तसेच बंद करण्यात आलेल्या रेशनकार्डांची गावनिहाय यादी सार्वजनिक करावी आणि लाभार्थ्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी विशेष शिबिरांचे आयोजन करावे, अशी मागणीही करण्यात आली.
रेशनकार्ड बंद झाल्यामुळे गरजू कुटुंबांसमोर निर्माण झालेल्या अडचणींची प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन तातडीने कार्यवाही करावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले. अन्यथा समाजवादी पार्टीच्या वतीने लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही आझाद पठाण यांनी दिला.
यावेळी तोसीफ बिल्डर, अझर मिर्झा, शेख नैवशाद, इक्बाल खान निमगाव, मोबीन खान निमगाव, शेख समीर उर्फ मास, शेख सलीम, अयुब खान, जमीर खान, फहीम सर, शेख अलीम, जमील्ला खान, शेख गाजी आणि सय्यद खालील यांच्यासह समाजवादी पार्टीचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
गरीबांच्या ताटातील घास हिरावू देणार नाही. रेशन हा पात्र लाभार्थ्यांचा हक्क असून, तो त्यांना मिळालाच पाहिजे, अशी ठाम भूमिका आझाद पठाण यांनी यावेळी व्यक्त केली.
