Jalgaon jamod

Buldhana NewsJalgaon jamod

जळगाव जामोद येथील महिलेच्या निर्घृण हत्येचा उलगडा; वडील आणि भावाला अटक

बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद पोलीस ठाण्याच्या हद्दीत आढळून आलेल्या महिलेच्या निर्घृण हत्येप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेला मोठे यश मिळाले असून मृत महिलेची हत्या तिच्याच वडिलांनी मुलाच्या मदतीने केल्याचे तपासात उघड झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी मध्यप्रदेशातील बुरहानपूर जिल्ह्यातील खडकी येथील बापूराम नथ्थु कलमेकर आणि त्यांचा मुलगा अजय बापूराम कलमेकर यांना अटक केली आहे.

दि. 26 एप्रिल 2026 रोजी सकाळी जळगाव जामोद तालुक्यातील राजूरा शिवारात एका महिलेचा मुंडके नसलेला अर्धवट जळालेला मृतदेह आढळून आला होता. घटनास्थळाजवळ मानवी कवटी तसेच जळालेल्या अवस्थेतील अवशेष सापडल्याने परिसरात खळबळ उडाली होती. या प्रकरणी सौ. मिना मनिष तडवी यांनी जळगाव जामोद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम 103(1) आणि 238 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. श्रेणिक लोढा, उपविभागीय पोलीस अधिकारी आनंद महाजन तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनिल अंबुलकर यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाची सूत्रे हाती घेतली. पोलीस अधीक्षकांनी स्थानिक गुन्हे शाखेला मृत महिलेची ओळख पटवून आरोपींना अटक करण्याचे आदेश दिले होते.

पोलीस निरीक्षक सुनिल अंबुलकर यांच्या नेतृत्वाखाली विविध पथके तयार करून बुलढाणा, अमरावती, अकोला, जळगाव खानदेश तसेच मध्यप्रदेशातील बुरहानपूर जिल्ह्यात तपास सुरू करण्यात आला. सीमावर्ती भागातील पोलीस ठाण्यांमधील बेपत्ता महिलांची माहिती तपासण्यात आली. गोपनीय माहितीदारांकडूनही माहिती गोळा करण्यात आली. सलग 12 दिवस समांतर तपास केल्यानंतर 9 मे रोजी पोलिसांना महत्त्वाची माहिती मिळाली.

तपासादरम्यान खकनार पोलीस ठाण्यात 1 मे रोजी दाखल झालेल्या बेपत्ता महिलेच्या तक्रारीची माहिती समोर आली. बापूराम कलमेकर यांनी त्यांची मुलगी शिवानी बापूराम कलमेकर ही 25 एप्रिलपासून बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती. पोलिसांनी संशयावरून बापूराम कलमेकर आणि त्यांचा मुलगा अजय कलमेकर यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.

तपासात उघडकीस आलेल्या माहितीनुसार, मृतक शिवानी हिचा विवाह 15 एप्रिल 2026 रोजी अमरावती जिल्ह्यातील धारणी तालुक्यातील प्रकाश भिलावेकर यांच्यासोबत झाला होता. विवाहानंतर ती माहेरी आली होती. दरम्यान, शिवानीचे तिच्या चुलत भावासोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून व ती समजावूनही ऐकत नसल्याने वडील बापूराम कलमेकर यांनी 23 एप्रिलच्या रात्री तिच्या डोक्यात बांबूने वार करून हत्या केली. त्यानंतर मृतदेह घरात ठेवून दुसऱ्या दिवशी मुलगा अजयच्या मदतीने मोटारसायकलवरून बुलढाणा जिल्ह्यातील राजूरा शिवारात आणून टाकण्यात आला.

मृत महिलेची ओळख पटू नये यासाठी आरोपींनी मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला. तसेच धड आणि मुंडके वेगवेगळ्या ठिकाणी फेकून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. रक्ताने माखलेले कपडे आणि हत्यार जंगलात फेकून दिल्याची कबुलीही आरोपींनी दिली आहे.

या प्रकरणातील आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक करून पुढील कारवाईसाठी जळगाव जामोद पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. पुढील तपास जळगाव जामोद पोलीस करीत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या आदेशानुसार, अपर पोलीस अधीक्षक डॉ. श्रेणिक लोढा, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड आणि उपविभागीय पोलीस अधिकारी आनंद महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनिल अंबुलकर यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली. या पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक यशोदा कणसे, पोउपनि पंकज सपकाळे, एजाज खान, गणेश पाटील, अजीज परसुवाले, अमोल शेजोळ, मंगेश सनगाळे, अमोल वनारे, दिपक वायाळ, राकेश नायडू, समाधान टेकाळे, शिवानंद हेलगे तसेच तांत्रिक विश्लेषण विभागाचे कैलाश ठोंबरे यांचा समावेश होता.

Jalgaon jamod

जळगाव जामोद येथे देशी बनावटीचे पिस्टलसह तिघांना अटक; १ लाख २२ हजारांचा मुद्देमाल जप्त

बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद परिसरात स्थानिक गुन्हे शाखेने १ एप्रिल २०२६ रोजी धाड टाकून देशी बनावटीचे पिस्टल बाळगणाऱ्या तिघांना अटक केली. आरोपींकडून पिस्टल, जिवंत काडतुसे आणि मोटारसायकल असा एकूण १ लाख २२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

आगामी सणोत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी बुलढाणा जिल्हा पोलीस दलाकडून विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. मध्यप्रदेश सीमेलगत असलेल्या सोनाळा, तामगाव आणि जळगाव जामोद या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत अवैध अग्नीशस्त्रांची तस्करी, खरेदी-विक्री आणि बेकायदेशीर साठा रोखण्यासाठी पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला विशेष कारवाईचे आदेश दिले होते.

या अनुषंगाने पोलीस निरीक्षक सुनिल अंबुलकर यांनी पथके तयार करून गुप्त माहितीच्या आधारे कारवाई सुरू केली. १ एप्रिल रोजी स्थानिक गुन्हे शाखेला माहिती मिळाली की, जळगाव जामोद हद्दीतील श्रीमंत ढाबा परिसरात काही जण बेकायदेशीर पिस्टल विक्रीसाठी आले आहेत. त्यानुसार पथकाने सापळा रचून पवन इंदरसिंग डावर (वय २३), संजय भिलासिंग बोडल (वय २०) आणि रमेश दुर्गासिंग बारेला (वय २४) यांना ताब्यात घेतले.

आरोपींची झडती घेतली असता त्यांच्या ताब्यातून एक देशी बनावटीचे पिस्टल मॅगझिनसह, दोन जिवंत काडतुसे आणि एक होंडा शाईन मोटारसायकल असा एकूण १ लाख २२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी पोलीस हवालदार गणेश पाटील यांच्या तक्रारीवरून जळगाव जामोद पोलीस ठाण्यात आर्म्स अॅक्टच्या कलम ३, ५ तसेच महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम १२३ आणि १३५ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या आदेशानुसार तसेच अपर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा आणि अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पोलीस निरीक्षक सुनिल अंबुलकर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक अविनाश जायभाये, पोलीस कर्मचारी दीपक लेकुरवाळे, शेख चाँद, गणेश पाटील आणि आशा मोरे यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वीरीत्या केली. पुढील तपास जळगाव जामोद पोलीस ठाणे करीत आहे.

Jalgaon jamod

वारकरी महिला भजनी दिंडी स्पर्धा भक्तीमय वातावरणात उत्साहात संपन्न

जळगाव जामोद: प्रतिनिधी: काजी अमीनुद्दीन
दिवंगत भाजपा जिल्हाध्यक्ष स्व. पंजाबराव देशमुख (नाना बापू) स्मृती प्रतिष्ठान, जळगाव जामोद यांच्या वतीने तसेच वारकरी साहित्य परिषद तालुका जळगाव जामोद व संग्रामपूर यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य वारकरी महिला भजनी दिंडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. ही स्पर्धा मोठ्या उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात पार पडली.

या स्पर्धेत जळगाव जामोद व संग्रामपूर तालुक्यातील विविध गावांमधून आलेल्या महिला भजनी दिंडींनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. टाळ-मृदंगाच्या गजरात आणि हरिनामाच्या जयघोषात सकाळी दुर्गा चौक येथून दिंडीला प्रारंभ झाला. तुकाराम चौक मार्गे ही दिंडी देवाशीष लॉन्स येथे पोहोचली. संपूर्ण परिसर भक्तीरसात न्हाऊन निघाला होता.

कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून राज्याचे कामगार मंत्री ना. आकाशभाऊ फुंडकर तसेच माजी मंत्री व विद्यमान आमदार संजयजी कुटे उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून ह.भ.प. गजानन महाराज गायकरवाड, अध्यक्ष वारकरी साहित्य परिषद, बुलढाणा जिल्हा भाग एक, ह.भ.प. अनंता महाराज महाले, अध्यक्ष वारकरी साहित्य परिषद, बुलढाणा जिल्हा भाग दोन तसेच ह.भ.प. मेघाताई सेतवाल, महिला अध्यक्षा, यांची उपस्थिती लाभली.

या वेळी मान्यवरांनी वारकरी परंपरेचे महत्त्व विशद करत महिला भजनी दिंडींमार्फत समाजात अध्यात्म, संस्कार व एकतेचा संदेश पोहोचत असल्याचे मत व्यक्त केले. स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व भजनी दिंडींना प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वारकरी साहित्य परिषद, स्व. पंजाबराव देशमुख स्मृती प्रतिष्ठान तसेच तालुक्यातील वारकरी, महिला कार्यकर्ते आणि स्वयंसेवकांनी मोलाचे सहकार्य केले. संपूर्ण कार्यक्रम शांततामय व शिस्तबद्ध पद्धतीने संपन्न झाला.