पद्मश्री डॉ. व्ही. बी. कोलते कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, मलकापूर येथे ‘भारतीय ज्ञान प्रणाली’ या विषयावर कार्यशाळा संपन्न
मलकापूर:
येथील पद्मश्री डॉ. व्ही. बी. कोलते कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये ‘भारतीय ज्ञान प्रणाली’ या विषयावर नुकतीच एक दिवसीय माहितीपूर्ण कार्यशाळा नुकतीच उत्साहात संपन्न झाली. भारताच्या समृद्ध बौद्धिक आणि पारंपरिक वारशाचा समकालीन शिक्षण, अभियांत्रिकी, संशोधन आणि तांत्रिक विकासात प्रभावी वापर कसा करता येईल, यावर या कार्यशाळेत सखोल मंथन करण्यात आले.महाविद्यालयाचे अध्यक्ष मा. श्री. डी. एन. पाटील, सचिव डॉ. ए. डब्ल्यू. कोलते, उपाध्यक्ष श्री. पी. डी. कोलते आणि कोषाध्यक्ष श्री. एस. जे. पाचपांडे यांच्या प्रेरणेने तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. डब्ल्यू. खर्चे आणि उपप्राचार्य डॉ. योगेश ए. खर्चे यांच्या नेतृत्वाखाली ही कार्यशाळा यशस्वीरीत्या पार पडली.
या कार्यशाळेत प्रमुख वक्ते म्हणून डॉ. श्रीकांत कल्लूरकर यांनी ऑनलाईन प्रणालीद्वारे उपस्थित राहून उपस्थितांना मार्गदर्शन केले. भारताच्या पारंपरिक ज्ञान प्रणालीची सर्वसमावेशक माहिती देणे आणि आधुनिक तांत्रिक अभ्यासक्रम तसेच वैज्ञानिक संशोधनात त्याचा व्यावहारिक अंतर्भाव कसा करावा, यावर त्यांनी प्रकाश टाकला. सत्रामध्ये आधुनिक अभियांत्रिकीच्या विविध क्षेत्रांत पारंपरिक भारतीय ज्ञानाचा समन्वय साधण्यावर भर देण्यात आला. पारंपरिक भारतीय ज्ञानाची सांगड वैज्ञानिक दृष्टिकोन, नाविन्यता, व्यावसायिक नैतिकता आणि शाश्वत तंत्रज्ञानाशी कशी घालावी, याविषयी सहभागी प्राध्यापक व विद्यार्थ्यांना प्रेरित करण्यात आले. तसेच आंतरविद्याशाखीय शिक्षण, सर्वांगीण विकास आणि मूल्याधारित अध्यापन पद्धतींमध्ये या प्रणालीचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
या उपक्रमासाठी महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे प्रमुख प्रा. आर. एम. चौधरी, कार्यक्रम समन्वयक प्रा. ख्याती चौधरी आणि प्रा. पी. बी. भिसे यांनी विशेष परिश्रम घेतले व सक्रिय सहभाग नोंदवला. आधुनिक अभियांत्रिकी समस्या सोडवताना भारताच्या प्राचीन ज्ञानाचा पाया कसा उपयुक्त ठरतो, याचा वस्तुपाठ या कार्यशाळेतून मांडण्यात आला. कार्यक्रमाची सांगता महाविद्यालयीन प्रशासन, प्राध्यापक वर्ग आणि विद्यार्थ्यांच्या सकारात्मक प्रतिसादाने झाली. उच्च तांत्रिक शिक्षणात वारसा, नैतिकता आणि नवोपक्रमाचा समन्वय साधणारे असे उपक्रम सातत्याने राबविण्याचा संकल्प या वेळी व्यक्त करण्यात आला.

