मिशन परिवर्तनअंतर्गत शेगाव ग्रामीण हद्दीत २०.५६ किलो गांजासह दोघांना अटक; १०.९६ लाखांचा मुद्देमाल जप्त
शेगाव, दि. १८ ऑक्टोबर २०२६ : बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या अंमली पदार्थविरोधी ‘मिशन परिवर्तन’ मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शेगाव ते खामगाव मार्गावरील सवर्णा शिवारात कारवाई करून गांजा बाळगणाऱ्या दोघांना अटक केली. या कारवाईत २० किलो ५६० ग्रॅम गांजासह दोन दुचाकी आणि दोन मोबाईल असा एकूण १० लाख ९६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
जिल्ह्यात अंमली पदार्थांची वाहतूक, साठवणूक, उत्पादन आणि विक्री करणाऱ्यांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांचे आणि कर्मचाऱ्यांचे स्वतंत्र पथक तयार करण्यात आले होते. या पथकाला १८ ऑक्टोबर रोजी गोपनीय माहिती मिळाली की, शेगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शेगाव ते खामगाव मार्गावरील सवर्णा शिवारात काही व्यक्ती गांजा बाळगून त्याची चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने थांबल्या आहेत.
या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यश ढाब्याजवळ पंचांच्या उपस्थितीत कारवाई केली. यावेळी हुसेन खान युसूफ खान (वय २५, रा. प्रभाग क्रमांक १२, शेगाव) आणि आसिफ खान एजान खान (वय २९, रा. ईदगाह प्लॉट, शेगाव, जि. बुलढाणा) हे दोघे गांजा बाळगताना आढळून आले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडील मुद्देमाल जप्त केला.
या कारवाईत २० किलो ५६० ग्रॅम गांजा, ज्याची किंमत १० लाख २६ हजार रुपये आहे, तसेच २५ हजार रुपये किमतीची अॅक्सिस मोपेड (क्रमांक एमएच २८ बीवाय ३१६९), २५ हजार रुपये किमतीची कावासाकी बॉक्सर दुचाकी (क्रमांक एमएच ३० के ९८८४) आणि २० हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल फोन जप्त करण्यात आले. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत १० लाख ९६ हजार रुपये आहे.
या प्रकरणी दोन्ही आरोपींविरुद्ध शेगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात अंमली औषधीद्रव्ये व मनःप्रभावी पदार्थ अधिनियम, १९८५ (एनडीपीएस) मधील कलम ८(क) आणि २०(ब)(ii)(क) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास शेगाव ग्रामीण पोलीस करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या आदेशानुसार, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड (बुलढाणा) आणि अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप (खामगाव) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक यशोदा कणसे, पोलीस हवालदार राजेंद्र टेकाळ, अनुपकुमार मेहेर, विजय वारुळे, पोलीस शिपाई मंगेश सनगाळे, अमोल वनारे, मनोज खरडे, सतीश नाटेकर, चालक सहायक फौजदार विकास देशमुख, चालक पोलीस हवालदार समाधान टेकाळे तसेच तांत्रिक विश्लेषण विभागाचे पोलीस शिपाई कैलास ठोंबरे यांनी या पथकात सहभाग घेतला.
टॅग्ज: बुलढाणा पोलीस, मिशन परिवर्तन, शेगाव ग्रामीण, गांजा जप्त, स्थानिक गुन्हे शाखा, अंमली पदार्थविरोधी कारवाई

