बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद पोलीस ठाण्याच्या हद्दीत आढळून आलेल्या महिलेच्या निर्घृण हत्येप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेला मोठे यश मिळाले असून मृत महिलेची हत्या तिच्याच वडिलांनी मुलाच्या मदतीने केल्याचे तपासात उघड झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी मध्यप्रदेशातील बुरहानपूर जिल्ह्यातील खडकी येथील बापूराम नथ्थु कलमेकर आणि त्यांचा मुलगा अजय बापूराम कलमेकर यांना अटक केली आहे.
दि. 26 एप्रिल 2026 रोजी सकाळी जळगाव जामोद तालुक्यातील राजूरा शिवारात एका महिलेचा मुंडके नसलेला अर्धवट जळालेला मृतदेह आढळून आला होता. घटनास्थळाजवळ मानवी कवटी तसेच जळालेल्या अवस्थेतील अवशेष सापडल्याने परिसरात खळबळ उडाली होती. या प्रकरणी सौ. मिना मनिष तडवी यांनी जळगाव जामोद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम 103(1) आणि 238 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. श्रेणिक लोढा, उपविभागीय पोलीस अधिकारी आनंद महाजन तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनिल अंबुलकर यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाची सूत्रे हाती घेतली. पोलीस अधीक्षकांनी स्थानिक गुन्हे शाखेला मृत महिलेची ओळख पटवून आरोपींना अटक करण्याचे आदेश दिले होते.
पोलीस निरीक्षक सुनिल अंबुलकर यांच्या नेतृत्वाखाली विविध पथके तयार करून बुलढाणा, अमरावती, अकोला, जळगाव खानदेश तसेच मध्यप्रदेशातील बुरहानपूर जिल्ह्यात तपास सुरू करण्यात आला. सीमावर्ती भागातील पोलीस ठाण्यांमधील बेपत्ता महिलांची माहिती तपासण्यात आली. गोपनीय माहितीदारांकडूनही माहिती गोळा करण्यात आली. सलग 12 दिवस समांतर तपास केल्यानंतर 9 मे रोजी पोलिसांना महत्त्वाची माहिती मिळाली.
तपासादरम्यान खकनार पोलीस ठाण्यात 1 मे रोजी दाखल झालेल्या बेपत्ता महिलेच्या तक्रारीची माहिती समोर आली. बापूराम कलमेकर यांनी त्यांची मुलगी शिवानी बापूराम कलमेकर ही 25 एप्रिलपासून बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती. पोलिसांनी संशयावरून बापूराम कलमेकर आणि त्यांचा मुलगा अजय कलमेकर यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.
तपासात उघडकीस आलेल्या माहितीनुसार, मृतक शिवानी हिचा विवाह 15 एप्रिल 2026 रोजी अमरावती जिल्ह्यातील धारणी तालुक्यातील प्रकाश भिलावेकर यांच्यासोबत झाला होता. विवाहानंतर ती माहेरी आली होती. दरम्यान, शिवानीचे तिच्या चुलत भावासोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून व ती समजावूनही ऐकत नसल्याने वडील बापूराम कलमेकर यांनी 23 एप्रिलच्या रात्री तिच्या डोक्यात बांबूने वार करून हत्या केली. त्यानंतर मृतदेह घरात ठेवून दुसऱ्या दिवशी मुलगा अजयच्या मदतीने मोटारसायकलवरून बुलढाणा जिल्ह्यातील राजूरा शिवारात आणून टाकण्यात आला.
मृत महिलेची ओळख पटू नये यासाठी आरोपींनी मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला. तसेच धड आणि मुंडके वेगवेगळ्या ठिकाणी फेकून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. रक्ताने माखलेले कपडे आणि हत्यार जंगलात फेकून दिल्याची कबुलीही आरोपींनी दिली आहे.
या प्रकरणातील आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक करून पुढील कारवाईसाठी जळगाव जामोद पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. पुढील तपास जळगाव जामोद पोलीस करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या आदेशानुसार, अपर पोलीस अधीक्षक डॉ. श्रेणिक लोढा, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड आणि उपविभागीय पोलीस अधिकारी आनंद महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनिल अंबुलकर यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली. या पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक यशोदा कणसे, पोउपनि पंकज सपकाळे, एजाज खान, गणेश पाटील, अजीज परसुवाले, अमोल शेजोळ, मंगेश सनगाळे, अमोल वनारे, दिपक वायाळ, राकेश नायडू, समाधान टेकाळे, शिवानंद हेलगे तसेच तांत्रिक विश्लेषण विभागाचे कैलाश ठोंबरे यांचा समावेश होता.
