Homebuldhanaबुलढाणा जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पूरस्थिती; ९१ महसूल मंडळांत अतिवृष्टीची नोंद, नुकसानग्रस्तांना तातडीच्या मदतीचे...

बुलढाणा जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पूरस्थिती; ९१ महसूल मंडळांत अतिवृष्टीची नोंद, नुकसानग्रस्तांना तातडीच्या मदतीचे पालकमंत्र्यांचे आश्वासन

बुलढाणा, दि. ३१ जुलै : बुलढाणा जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. जिल्ह्यातील ९२ महसूल मंडळांपैकी तब्बल ९१ महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. परिस्थितीवर प्रशासनाकडून सातत्याने लक्ष ठेवण्यात येत असून जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी जिल्हाधिकारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सतत संपर्क ठेवून परिस्थितीचा आढावा घेत असल्याची माहिती दिली.

पूर आणि अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या सर्व नागरिकांना शासनामार्फत आवश्यक ती मदत उपलब्ध करून दिली जाईल, असे आश्वासन पालकमंत्री मकरंद जाधव पाटील यांनी दिले. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता सतर्क राहावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

सततच्या पावसाचा सर्वाधिक फटका जळगाव जामोद आणि संग्रामपूर तालुक्यांना बसला आहे. अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने अन्नधान्य, घरगुती साहित्य तसेच जीवनावश्यक वस्तूंचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेती पाण्याखाली गेल्याने उभ्या पिकांचेही नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

दरम्यान, संग्रामपूर आणि जळगाव जामोद तालुक्यांतील नुकसानग्रस्त शेतकरी व नागरिकांना तातडीने आर्थिक मदत आणि नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केली आहे. शेती, घरे आणि विविध पायाभूत सुविधांचे झालेले नुकसान लक्षात घेऊन प्रशासनाने पंचनामे तातडीने पूर्ण करून मदत प्रक्रिया वेगाने राबवावी, अशी मागणीही त्यांनी केली.

जिल्हा प्रशासनाने नुकसानग्रस्त भागांमध्ये सर्वेक्षण आणि पंचनाम्याचे काम सुरू केले असून बाधित शेती, घरे आणि इतर मालमत्तेच्या नुकसानीचा अहवाल तातडीने तयार करण्याच्या सूचना संबंधित विभागांना देण्यात आल्या आहेत. महसूल, आपत्ती व्यवस्थापन आणि इतर संबंधित यंत्रणा सतर्क ठेवण्यात आल्या असून पूरस्थितीवर चोवीस तास लक्ष ठेवले जात आहे.

दरम्यान, अनेक भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू असल्याने नागरिकांनी नदी, नाले, पूरग्रस्त क्षेत्र आणि धोकादायक ठिकाणी जाणे टाळावे, तसेच प्रशासनाकडून वेळोवेळी जारी करण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करून सुरक्षिततेची काळजी घ्यावी, असे आवाहन पालकमंत्री मकरंद जाधव पाटील यांनी केले.

Zafar Khan
Zafar Khanhttps://viralnewslive.in
Zafar Khan Athar Khan is the Editor-in-Chief of Viral News Live, a daily newspaper covering news from Buldhana district and across Maharashtra. He is an active journalist committed to public interest reporting, focusing on local governance, crime news, social issues, and matters affecting the common people. He currently serves as the District President of Voice of Media (Urdu Wing) in Buldhana and works to strengthen responsible journalism and raise important public issues through independent media. Contact Information Email: zafar@viralnewslive.in Mobile: +91 9881850730
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments