Buldhana News

सिनेस्टाईल पाठलागातून ५ दरोडेखोर जेरबंद; ४.८० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

बुलढाणा जिल्ह्यातील अंढेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या दरोड्याच्या गुन्ह्यात पोलिसांनी अवघ्या २४ तासांत सिनेस्टाईल पाठलाग करत पाच आरोपींना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून सुमारे ४ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई १ मे २०२६ रोजी करण्यात आली.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी चंद्रशेखर गुंडय्या स्वामी (वय ३२, रा. शंकरनगर, वसरणी, नांदेड) यांनी अंढेरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. आरोपींनी रत्न व सुलेमानी हकीक खडा विक्रीसाठी असल्याचा व्हिडिओ पाठवून त्यांना चिखली येथील राजवाडा परिसरात बोलावले. तेथे आरोपींनी संगनमत करून फिर्यादीस मारहाण करत त्यांच्याकडील सोने, चांदी, अष्टधातूचे दागिने व रोख रक्कम असा एकूण ४ लाख ८९ हजार रुपयांचा मुद्देमाल जबरीने लुटून नेला.

या प्रकरणी अंढेरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१० (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेनंतर आरोपी फरार झाले होते. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक सुनिल अंबुलकर आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक रुपेश शक्करगे यांनी विशेष पथकाची स्थापना करून आरोपींचा शोध सुरू केला.

तपासादरम्यान पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की मुख्य आरोपी निलेश नरेश भोसले हा साकेगाव येथे असून इतर आरोपी जालना जिल्ह्याकडे पळून जात आहेत. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ नाकाबंदी करून शोधमोहीम राबवली. साकेगाव येथून निलेश भोसले याला अटक करण्यात आली, तर उर्वरित आरोपींचा पाठलाग करत पोलिसांनी सुमारे तीन किलोमीटर शेतामध्ये धावत जाऊन त्यांना जेरबंद केले.

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये जॅकीचंद विरोधभाई पवार, आदित्य शेनू भोसले, राज अभिमान पवार आणि भाऊराजा शाबनदार पवार यांचा समावेश आहे. आरोपींकडून सोन्याच्या अंगठ्या, कुंडले, चांदीचे दागिने, अष्टधातूची वस्तू तसेच रोख रक्कम असा एकूण ४ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल पूर्णपणे हस्तगत करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या आदेशानुसार, अपर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड आणि उपविभागीय अधिकारी संतोष खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पोलीस निरीक्षक सुनिल अंबुलकर यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रुपेश शक्करगे, पीएसआय प्रताप बाजड यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखा आणि अंढेरा पोलीस ठाण्याच्या पथकातील अधिकाऱ्यांनी ही यशस्वी कारवाई केली.

Zafar Khan

Zafar Khan Athar Khan is the Editor-in-Chief of Viral News Live, a daily newspaper covering news from Buldhana district and across Maharashtra. He is an active journalist committed to public interest reporting, focusing on local governance, crime news, social issues, and matters affecting the common people. He currently serves as the District President of Voice of Media (Urdu Wing) in Buldhana and works to strengthen responsible journalism and raise important public issues through independent media. Contact Information Email: zafar@viralnewslive.in Mobile: +91 9881850730

Zafar Khan has 204 posts and counting. See all posts by Zafar Khan