मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेने अवैध देशी दारू वाहतूक करणाऱ्या एका आरोपीस अटक करून त्याच्याकडून ९३ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई ९ जून २०२६ रोजी उमाळी शिवार परिसरात करण्यात आली. आरोपीकडून १० बॉक्स देशी दारू आणि एक मोटारसायकल जप्त करण्यात आली असून त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्ह्यातील अवैध व विनापरवाना देशी-विदेशी मद्यसाठा, मद्याची चोरटी वाहतूक व विक्री करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक आशिष रोही यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांची विशेष पथके तयार करून अवैध धंद्यांविरोधात मोहीम सुरू केली होती.
दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली की, एक व्यक्ती मोटारसायकलवर अवैधरित्या देशी दारूची वाहतूक करून विक्रीसाठी घेऊन जात आहे. या माहितीच्या आधारे पथकाने उमाळी शिवार परिसरात नाकाबंदी केली. कारवाईदरम्यान मोहन नयनसिंग जाधव (वय ३७, रा. गिरणी, ता. मलकापूर, जि. बुलढाणा) हा मोटारसायकलवर देशी दारूची वाहतूक करताना आढळून आला.
तपासणीदरम्यान आरोपीच्या ताब्यातून ४३ हजार २०० रुपये किमतीचे १० बॉक्स देशी दारू तसेच ५० हजार रुपये किमतीची मोटारसायकल असा एकूण ९३ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी आरोपीविरुद्ध मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारुबंदी कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास मलकापूर ग्रामीण पोलीस करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या आदेशान्वये तसेच अपर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा (खामगाव) आणि अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड (बुलढाणा) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक आशिष रोही यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रताप बाजड, पोलीस हेड कॉन्स्टेबल गजानन दराडे, जगदेव टेकाळे, दिनेश बकाले, युवराज राठोड, महिला पोलीस कॉन्स्टेबल पूजा साळवे, कोमल इंगळे आणि पोलीस कॉन्स्टेबल मनोज खरडे यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली.
