मलकापूर: महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (MSRTC) मलकापूर आगाराचा भोंगळ आणि निष्काळजी कारभार वारंवार चव्हाट्यावर येत आहे. योग्य मेंटेनन्स न करताच नादुरुस्त बसेस रस्त्यावर पाठविल्या जात असल्याने प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सलग दोन दिवसांत दोनदा बस बंद पडल्याची धक्कादायक घटना समोर आली असून, आगार व्यवस्थापकांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
नेमकी घटना काय?
पहिली घटना (३० एप्रिल २०२६): मलकापूर डेपोची गाडी क्र. ८०४६ ही ‘शेलगाव बाजार ते मलकापूर’ मार्गावर धावत असताना, मलकापूर जवळील सालीपुरा फाटा येथे ब्रेक प्रेशर पाईप फुटल्यामुळे अचानक ब्रेकडाऊन झाली. सुदैवाने चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अपघात टळला आणि प्रवाशांचे प्राण वाचले.
दुसरी घटना (१ मे २०२६): सालीपुरा फाटा येथील घटनेनंतरही आगाराकडून गाडीची कोणतीही योग्य दुरुस्ती किंवा मेंटेनन्स करण्यात आला नाही. उलटपक्षी, आगार व्यवस्थापकांनी १ मे रोजी हीच बस पुन्हा मार्गावर पाठवली. परिणामी, दिडोळा फाटा येथे पुन्हा एकदा ही बस ब्रेकडाऊन झाली.
मागील आठवड्यात देखील २३/०४ रोजी हरणखेड गाडीचे मागील चाके निखळल्या गेली होती.
आगारातील अंतर्गत अनागोंदी आणि गंभीर आरोप या संतापजनक प्रकारामुळे आगाराच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत:
आगार व्यवस्थापक व संबंधित अधिकारी प्रवाशांच्या जीवाशी का खेळत आहेत? नादुरुस्त गाड्यांना रस्त्यावर उतरवण्याची परवानगी कशी दिली जाते?
गेल्या ८ वर्षांपासून एकाच जागी कार्यालयात ठाण मांडून बसलेल्या कार्यालयीन कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आलेल्या नसुन प्रचंड घोळ आहे.
’T9′ रोटेशन पद्धतीची अंमलबजावणी केवळ कागदावरच सुरू असून, पारदर्शकतेचा अभाव आहे.
आगार व्यवस्थापकांच्या आदेशामुळे कर्मचारी एकमेकांच्या विरोधात कुटिल कारस्थान करत असल्याचा संशय कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण झाला असून कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे.
शिवसेना तालुका प्रमुख दिपक चांभारे पाटील काय भूमिका घेणार?
”मलकापूर आगारात चाललेला मनमानी कारभार आणि प्रवाशांच्या जिवाशी खेळणे अजिबात खपवून घेतले जाणार नाही. दोन दिवसांत एकाच बसचे दोनदा ब्रेकडाऊन होणे हे या भ्रष्ट आणि निष्काळजी व्यवस्थेचे उत्तम उदाहरण आहे. या सर्व अनागोंदी प्रकरणी शिवसेना आगार व्यवस्थापकांच्या बदलीची मागणी करणार का? याकडे आता संपूर्ण मलकापूरकरांचे लक्ष लागले आहे.”
— संपादकीय टिप्पणी
आता या प्रकरणी एसटी महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी काय कारवाई करतात आणि शिवसेना आगार व्यवस्थापकांच्या बदलीसाठी आक्रमक भूमिका घेते का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
मलकापूर आगाराचा निष्काळजीपणा: नादुरुस्त बस पुन्हा रस्त्यावर उतरविल्याने सलग दुसऱ्या दिवशी ब्रेकडाऊन; प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरूच!





