बुलढाणा, दि. 7 जून : महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटखा व सुगंधित तंबाखूजन्य पदार्थांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत बुलढाणा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील देऊळघाट येथे 5 लाख 78 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मानवी आरोग्यास अत्यंत घातक ठरणाऱ्या प्रतिबंधित गुटखा व सुगंधित पान मसाल्याची विक्री, वाहतूक आणि साठवणूक करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक आशिष रोही यांनी विशेष पथके तयार करून कारवाईचे नियोजन केले होते.
स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, मारुती सुझुकी स्विफ्ट डिझायर (एमएच-28-ईटी-5300) या वाहनातून प्रतिबंधित गुटखा आणि सुगंधित पान मसाल्याची वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार देऊळघाट येथे सापळा रचून वाहनाची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान वाहनात मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा व सुगंधित पान मसाला आढळून आला.
या कारवाईत चालक शेख सलीम शेख इस्माईल (वय 59 वर्षे, रा. सैलानीनगर, चिखली, ता. चिखली) याला ताब्यात घेण्यात आले. आरोपीकडून 3 लाख 28 हजार 900 रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व पान मसाला तसेच 2 लाख 50 हजार रुपये किमतीचे वाहन असा एकूण 5 लाख 78 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी बुलढाणा ग्रामीण पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम 274, 275, 223, 123, 3(5) तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम 2006 अंतर्गत संबंधित कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास बुलढाणा ग्रामीण पोलीस करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या आदेशान्वये तसेच अपर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा आणि अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक आशिष रोही यांच्या नेतृत्वाखाली पोहेकॉ. दीपक लेकुरवाळे, विजय वारुळे, अनुपकुमार मेहेर, राजेंद्र टेकाळे आणि पोलीस कॉन्स्टेबल अमोल वनारे यांनी कारवाईत सहभाग घेतला.
