बुलढाणा, दि. 22 मे : नागरी हक्क संरक्षण पथक, बुलढाणा यांच्या वतीने अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 तसेच सुधारित अधिनियम 2015 च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आणि गुणवत्तापूर्ण तपास प्रक्रियेबाबत विशेष पोलीस कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. ही कार्यशाळा शुक्रवार, 22 मे रोजी प्रभा हॉल, पोलीस मुख्यालय, बुलढाणा येथे सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेदरम्यान पार पडली.
सदर कार्यशाळा महाराष्ट्र राज्य नागरी हक्क संरक्षण विभागाच्या अपर पोलीस महासंचालक मा. अश्वती दोर्जे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती. कार्यक्रमाची प्रस्तावना नागरी हक्क संरक्षण पथकाच्या पोलीस निरीक्षक श्रीमती अर्चना जाधव यांनी केली.
कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड उपस्थित होते. त्यांनी अॅट्रॉसिटी कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पोलीस अधिकाऱ्यांनी संवेदनशीलतेने व जबाबदारीने कार्य करण्याचे आवाहन केले.
कार्यशाळेत सेवानिवृत्त पोलीस उपअधीक्षक दिलीप तडवी, बार्टीचे प्रकल्प अधिकारी महेंद्र शामदे, अॅड. दिपक मापारी तसेच विधी व सेवा प्राधिकरणाचे अॅड. सानप यांनी मार्गदर्शक म्हणून सहभाग घेतला. त्यांनी अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्ह्यांचा प्रभावी तपास, पीडितांना तात्काळ न्याय व मदत मिळवून देण्याची प्रक्रिया आणि कायद्याची काटेकोर अंमलबजावणी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
या कार्यशाळेत जिल्ह्यातील विविध पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोलीस उपनिरीक्षक रामदास वाढे आणि सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक केशव नागरे यांनी केले.
कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी पोलीस निरीक्षक श्रीमती अर्चना जाधव आणि नागरी हक्क संरक्षण पथकाच्या संपूर्ण कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
