पीकविमा आणि शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आक्रमक; ३ डिसेंबरपासून आमरण उपोषणाचा इशारा
मलकापूर : मलकापूर आणि नांदुरा तालुके दुष्काळग्रस्त घोषित झाले असतानाही शेतकऱ्यांना अद्याप पीकविम्याची रक्कम मिळालेली नाही. त्यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना तातडीने पीकविमा आणि दुष्काळी मदत देण्यात यावी, यासह विविध मागण्यांसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांसह आक्रमक भूमिका घेतली आहे. मागण्यांची आठ दिवसांत पूर्तता न झाल्यास ३ डिसेंबर २०२६ पासून मलकापूर येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
यापूर्वी शेतकऱ्यांना पीकविमा मिळावा, यासाठी संबंधित विमा कंपनीला निवेदन देण्यात आले होते. मात्र, कंपनीकडून समाधानकारक उत्तरे मिळत नसल्याने शिवसेना पदाधिकारी आणि शेतकऱ्यांनी विमा कंपनीच्या कार्यालयाला टाळे ठोकून निषेध व्यक्त केला होता. तरीही कंपनीकडून कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आली नसल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
शेतकऱ्यांना पीकविम्याची रक्कम तातडीने अदा करावी, शासनाने जाहीर केलेली दुष्काळी आर्थिक मदत त्वरित वितरित करावी आणि शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपयांची आर्थिक मदत द्यावी, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे.
याशिवाय अनेक शेतकऱ्यांनी बचत गट तसेच बँकांकडून मुदत कर्ज घेतले आहे. कर्जमाफीचा लाभ मिळाल्यानंतरही काही बँका संबंधित शेतकऱ्यांना नवीन पीककर्ज देण्यास टाळाटाळ करीत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे शासनाने बँकांना आवश्यक निर्देश देऊन अशा शेतकऱ्यांना तातडीने पीककर्ज उपलब्ध करून द्यावे, अशी मागणीही करण्यात आली आहे.
विवरा-रणगाव रस्त्याचे काम गेल्या सहा महिन्यांपासून अपूर्ण आहे. तसेच विवरा गावातील मधुकर हरी पाटील यांच्या वाड्यापासून ओंकार चोपडे यांच्या घरापर्यंत जिल्हा परिषद बांधकाम विभागाने मंजूर केलेल्या रस्त्याचे काम आणि विवरा ते राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ पर्यंतच्या नाली खोलीकरणाचे कामही अपूर्ण अवस्थेत आहे. ही कामे गावाजवळ अर्धवट सोडण्यात आली असून, जिल्हाधिकाऱ्यांनी पूर्णत्वाचे आदेश देऊनही अद्याप कामे पूर्ण झालेली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. संबंधित सर्व विकासकामे तातडीने पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली आहे.
वरील सर्व मागण्यांची आठ दिवसांच्या आत पूर्तता करण्यात यावी. अन्यथा ३ डिसेंबर २०२६ पासून उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात येईल. या आंदोलनादरम्यान उद्भवणाऱ्या परिस्थितीची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
या निवेदनावर शिवसेना जिल्हा सहसंपर्कप्रमुख वसंतराव भोजने, उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर, विधानसभा संघटक राजेशसिंह राजपूत, माजी नगर परिषद उपाध्यक्ष महादेव वनारे, माजी नगरसेवक पांडुरंग चिम, उपशहरप्रमुख बाळू पोलाखरे, उपशहरप्रमुख शकील जमादार, वाहतूक सेना शहरप्रमुख इम्रान लकी, अल्पसंख्याक सेना उपजिल्हाप्रमुख सय्यद वसीम, विभागप्रमुख चांद चव्हाण, अर्जुन कुयटे, दीपक कोथळकर, अजय सोनवणे, हसन गौरी, मोहम्मद इमरान घातक, गोपाल धाडे, इमामभाई आणि रफीकभाई पजायवाले यांच्यासह शेतकरी व शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.
