वडोदा जिल्हा परिषद उर्दू शाळेला कायमस्वरूपी शिक्षक; गटशिक्षणाधिकारी व शिवसेना पदाधिकाऱ्यांचा सत्कार
मलकापूर, ११ सप्टेंबर २०२६: तालुक्यातील वडोदा येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेत इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना एकाच शिक्षकाकडून अध्यापन केले जात असल्याने निर्माण झालेल्या शैक्षणिक अडचणींची दखल घेत अखेर शाळेला कायमस्वरूपी शिक्षक देण्यात आला. शिक्षक मिळाल्यानंतर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजीक खान मोहम्मद यांच्या पुढाकाराने पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी अभिमन्यू खराडे तसेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा ११ सप्टेंबर रोजी गटशिक्षणाधिकारी कार्यालयात सत्कार करण्यात आला.
वडोदा येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेत इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंतच्या वर्गांसाठी केवळ एकच शिक्षक कार्यरत असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याची तक्रार शाळा व्यवस्थापन समितीकडून वेळोवेळी पंचायत समिती प्रशासनाकडे करण्यात आली होती. मात्र, वारंवार लेखी व तोंडी तक्रारी करूनही शिक्षकाची नियुक्ती न झाल्याने शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजीक खान मोहम्मद यांनी या समस्येबाबत शिवसेना (उबाठा) उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर यांच्याकडे पाठपुरावा केला.
या प्रश्नावर गजानन ठोसर यांनी शाळेला शिक्षक उपलब्ध करून न दिल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर शाळेला शिक्षक न मिळाल्यास शाळेला टाळे ठोकण्याचे आंदोलन करण्यात आले. तरीही प्रशासनाकडून अपेक्षित कार्यवाही न झाल्याने पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी कार्यालयालाच टाळे ठोक आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. त्यानंतर वडोदा येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेला कायमस्वरूपी शिक्षक देण्यात आला.
शाळेला शिक्षक मिळाल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजीक खान मोहम्मद यांनी ११ सप्टेंबर रोजी गटशिक्षणाधिकारी कार्यालयात छोटेखानी सत्कार समारंभाचे आयोजन केले. यावेळी गटशिक्षणाधिकारी अभिमन्यू खराडे यांच्यासह शिवसेना (उबाठा) पदाधिकाऱ्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला शिक्षण विस्तार अधिकारी एन. जे. फाळके, शिक्षण विस्तार अधिकारी एन. बी. शिंदे, केंद्रप्रमुख एम. बी. महाले, मुख्याध्यापक अनिल खर्चे, शिवसेना (उबाठा) उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर, उपशहरप्रमुख बाळू पोलाखरे, उपशहरप्रमुख शकील जमादार, कामगार सेना तालुकाप्रमुख राम थोरबोले, विभागप्रमुख चाँद चव्हाण, शाखाप्रमुख रफिक भाई पजायवाले, हसन गौरी यांच्यासह शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी फिरोज खान कादर सर, वडोदा ग्रामपंचायत सदस्य जिया खान, शेख आसिफ शेख नजीर, शेख जुबेर शेख मुनीर, अब्दुल अनिस खान तसेच वडोदा येथील शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य उपस्थित होते. कायमस्वरूपी शिक्षक मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेला चालना मिळेल, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.

