मलकापुर | दैनिक वायरल न्यूज़ लाइव
मलकापूर येथील संत ज्ञानेश्वर नगर, सातव प्लॉट, प्रभाग क्रमांक १५ मधील नागरिकांनी पिण्याच्या पाण्याच्या तीव्र टंचाईविरोधात पाणीपुरवठा अभियंता कार्यालयात आमरण उपोषणास सुरुवात केली आहे. माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक ॲड. हरीश रावळ यांच्या नेतृत्वाखाली हे उपोषण सुरू असून, पाणीपुरवठा सुरळीत होईपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा इशारा देण्यात आला आहे.
गेल्या आठ महिन्यांपासून या परिसरातील सुमारे पंधरा ते वीस घरांना नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. पाणीपुरवठा अभियंता बयेस यांना अनेक वेळा लेखी व तोंडी विनंत्या करूनही समस्या मार्गी लागलेली नाही, असा आरोप नागरिकांनी केला आहे. नळाला पाणी येत नसल्याने महिलांना उन्हातान्हात एक ते दीड किलोमीटर अंतरावरून चांडक विद्यालयाजवळील पाणीपुरवठा विभागाकडून पाणी डोक्यावर वाहून आणावे लागत आहे.
या समस्येच्या निषेधार्थ नागरिकांनी थेट पाणीपुरवठा अभियंता कार्यालयातच आमरण उपोषण सुरू केले आहे. जोपर्यंत प्रत्यक्ष कामाला सुरुवात होऊन पाणीपुरवठा नियमित होत नाही, तोपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला आहे.
या आंदोलनात ॲड. हरीश रावळ यांच्यासह अनिल बगाडे, पांडुरंग जगताप, गोपाल कावस्कर, कमलबाई भोपळे, शोभाबाई वावगे, लताबाई ईसाळकर, जिजाबाई जगताप, मंजुळाबाई देविकार, शारदाबाई जगताप, लक्ष्मीबाई वायडे, सरलाबाई वायडे, उषाबाई खराटे, जान्हवी वायडे, विशाल भोपळे, गणेश खराटे, चंदू वायडे, छोटूभाऊ ईसाळकर, विजय वायडे, हरीभाऊ कावस्कर, गोपाल वावगे, सागर जोशी, गणेश भोपळे, राहुल वायडे, भाग्यश्री वायडे, कैलास वायडे यांसह अनेक महिला व पुरुष सहभागी झाले आहेत.
दरम्यान, प्रशासनाने तातडीने लक्ष घालून पाणीपुरवठ्याचा प्रश्न मार्गी लावावा, अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे.




