बुलढाणा, दि. १४ जून : देऊळगाव राजा तालुक्यातील पिंपळनेर परिसरात अथर्व सीड्स कंपनीच्या कांदा बियाण्यांची चोरी करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला असून या प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून ५ क्विंटल ३६ किलो कांदा बियाणे, दोन दुचाकी आणि तीन मोबाईल फोन असा एकूण ५ लाख २१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, देऊळगाव राजा येथील भाजीमंडी परिसरातील रहिवासी मोहम्मद अजहर मोहम्मद कलंदर (वय ३६) यांनी २ जून २०२६ रोजी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तक्रारीनुसार, २४ मे २०२६ रोजी रात्री ते २५ मे २०२६ रोजी पहाटेदरम्यान सिंदखेड राजा रोडवरील पिंपळनेर येथील जुब्बुजी मायोमास ब्रिकेट इंडस्ट्री कंपनीमध्ये प्रक्रिया करण्यासाठी आणलेले अथर्व सीड्स कंपनीचे १४ पोते कांदा बियाणे अज्ञात चोरट्यांनी लंपास केले होते. चोरीस गेलेल्या बियाण्यांचे वजन सुमारे ६ क्विंटल ६५ किलो असून त्यांची किंमत ४ लाख ६५ हजार ५०० रुपये होती.
या प्रकरणी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २५९/२०२६ दाखल करण्यात आला होता. पोलीस अधीक्षक नीलेश तांबे यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेला गुन्ह्याचा समांतर तपास करून आरोपींचा शोध घेण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेने गोपनीय माहितीच्या आधारे जालना, छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगर जिल्ह्यांत शोधमोहीम राबविली.
तपासादरम्यान अंकुश तेजराव खंडारे (वय ४०, रा. सातेगाव, ता. जाफराबाद, जि. जालना), विनोद विठ्ठल काळे (वय २९, रा. लोणगाव, ता. भोकरदन, जि. जालना) आणि भानुदास उर्फ राहुल बाबूराव गायकवाड (वय ३२, मूळ रा. देऊळगाव राजा, सध्या भारस्करवाडी, ता. शेवगाव, जि. अहिल्यानगर) यांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली.
आरोपींकडून ५ क्विंटल ३६ किलो कांदा बियाणे, युनिकॉर्न कंपनीची एक दुचाकी, शाइन कंपनीची एक दुचाकी तसेच तीन मोबाईल फोन जप्त करण्यात आले. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत ५ लाख २१ हजार ५०० रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली. अटक आरोपींना पुढील कारवाईसाठी देऊळगाव राजा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नीलेश तांबे यांच्या आदेशानुसार तसेच अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा आणि अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे आशीष रोही, प्रताप बाजाड, शरद गिरी, गजानन दराडे, जगदेव टेकाळे, युवराज राठोड, मनोज खारदे तसेच तांत्रिक विश्लेषण विभागाचे राजू अडवे यांनी या कारवाईत सहभाग घेतला.
