बुलढाणा जिल्ह्यात नागरिकांना कमी रकमेच्या मोबदल्यात जास्त रकमेच्या नोटा देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या टोळीविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. शनिवारी, 26 जुलै 2026 रोजी मलकापूर शहरातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील कुंड परिसरात सापळा रचून दोन आरोपींना अटक करण्यात आली. आरोपींकडून रोख रक्कम, चिल्ड्रेन बँकेच्या बनावट नोटा, मोबाईल, चाकू आणि मोटारसायकल असा एकूण 2 लाख 45 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून काही समाजकंटकांकडून नागरिकांना एक लाख रुपयांच्या बदल्यात दहा लाख रुपयांच्या नोटा देण्याचे आमिष दाखवून फसवणुकीच्या घटना घडत असल्याची गंभीर दखल पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी घेतली होती. त्यांनी अशा टोळ्यांचा शोध घेऊन कठोर कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक आशिष रोही यांनी विशेष पथके तयार करून कारवाईचे नियोजन केले.
कारवाईदरम्यान स्थानिक गुन्हे शाखेला गोपनीय माहिती मिळाली की, हिवरखेड, ता. तेल्हारा, जि. अकोला येथील सुभाष माणिकराव गावंडे यांना मलकापूर परिसरात काही जण दहा लाख रुपयांच्या नोटांचे आमिष दाखवून फसवण्याचा प्रयत्न करत आहेत. या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने कुंड परिसरात सापळा रचून अभिषेक भीमराव इंगळे (वय 20, रा. कुऱ्हा-काकोडा, ता. मुक्ताईनगर, जि. जळगाव) आणि मयूर सुनील खानझोडे (वय 19, रा. कुऱ्हा-काकोडा, ता. मुक्ताईनगर, जि. जळगाव) या दोघांना ताब्यात घेतले.
आरोपींच्या ताब्यातून 5 हजार रुपये रोख, दर्शनी किंमत 10 लाख रुपये असलेल्या ‘चिल्ड्रेन बँक’च्या बनावट नोटा, एक चाकू, चार मोबाईल फोन आणि स्प्लेंडर प्लस मोटारसायकल असा एकूण 2 लाख 45 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी सुभाष माणिकराव गावंडे यांच्या फिर्यादीवरून मलकापूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 553/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता कलम 310(2) तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 135 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणातील घटनास्थळावरून पसार झालेल्या आणखी सहा आरोपींचा शोध स्थानिक गुन्हे शाखा आणि मलकापूर शहर पोलीस घेत असून, गुन्ह्याचा पुढील तपास मलकापूर शहर पोलीस करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या आदेशानुसार तसेच अपर पोलीस अधीक्षक पियूष जगताप आणि अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आशिष रोही यांच्या नेतृत्वात करण्यात आली. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक अविनाश जायभाये, प्रशांत डगवार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र अंभोरे तसेच गजानन दराडे, गणेश पाटील, अनुपकुमार मेहेर, विजय पैठणे, राकेश नायडू, गजानन गोरले, अमोल वानेरे, मनोज खरडे आणि सतीश नाटेकर यांनी सहभाग घेतला.
