मलकापूरच्या व्ही. बी. कोलते कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचा राष्ट्रीय सन्मान; नवी दिल्लीत IEI Award 2026 प्रदान
मलकापूर (प्रतिनिधी):
अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान शिक्षण क्षेत्रात आपल्या गुणवत्तेचा आणि उत्कृष्टतेचा डंका वाजवत मलकापूर येथील पद्मश्री डॉ. व्ही. बी. कोलते कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगने राष्ट्रीय स्तरावर सुवर्णयश संपादन केले आहे. द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स इंडिया तर्फे नवी दिल्ली येथील लोधी रोड स्थित ‘स्कोप कन्व्हेन्शन सेंटर’ मध्ये 19 सप्टेंबर रोजी आयोजित भव्य पुरस्कार सोहळ्यात महाविद्यालयाला ‘आयईआय अवॉर्ड २०२६’ (इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स अवॉर्ड २०२६) प्रदान करून सन्मानित करण्यात आले. या राष्ट्रीय पुरस्कारामुळे संपूर्ण परिसरात आणि शिक्षण क्षेत्रात आनंदाचे व अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
‘द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स (इंडिया)’ तर्फे उद्योग आणि अभियांत्रिकी शिक्षण क्षेत्रातील उत्कृष्टतेचा गौरव करण्यासाठी ‘१८ वा आयईआय इंडस्ट्री एक्सलन्स अवॉर्ड २०२६’ आणि ‘५ वा आयईआय इंजिनिअरिंग एज्युकेशन एक्सलन्स अवॉर्ड २०२६’ या दुहेरी सोहळ्याचे अतिशय उत्साहात आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला देशभरातील नामांकित अभियांत्रिकी संस्थांचे प्रतिनिधी, दिग्गज उद्योगपती, शिक्षणतज्ज्ञ, संशोधक आणि वरिष्ठ अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे मुख्य सूत्र ‘आत्मनिर्भर भारत ते ग्लोबल इंडिया: आत्मविश्वासाने स्वयंपूर्णतेकडे’ या संकल्पनेवर आधारित होते. कार्यक्रमात डॉ. अंजू राठी राणा, लेफ्टनंट जनरल हरपाल सिंग (माजी इंजिनिअर-इन-चीफ), आणि सुश्री निधी बन्सल (संचालक, डीटीडीएफ ) हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच एनसीव्हीईटी चे संचालक डॉ. संदीपन नारोटे यांचे मार्गदर्शक मुख्य भाषण झाले. कार्यक्रमादरम्यान आयोजित पॅनेल चर्चेत भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड, एचएलएल लाईफकेअर, होल्टेक कन्सल्टिंग आणि जे. के. टायर्स यांसारख्या भारतातील आघाडीच्या औद्योगिक संस्थांच्या प्रमुखांनी विचार मंथन केले.
या गौरवशाली राष्ट्रीय सोहळ्यात पद्मश्री डॉ. व्ही. बी. कोलते कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, मलकापूर तर्फे महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. युगेश खर्चे, आयक्यूएसी डीन प्रा. आर. एम. चौधरी आणि इलेक्ट्रिकल विभागप्रमुख प्रा. जयप्रकाश सोनोने यांनी विशेष सहभाग घेतला व महाविद्यालयाच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारला.
या दिल्ली दौऱ्यादरम्यान महाविद्यालयाच्या प्रतिनिधींनी देशभरातून आलेल्या विविध उद्योगांचे प्रतिनिधी, सेंटर ऑफ एक्सलन्स, भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे नोडल अधिकारी, तसेच नामांकित अभियांत्रिकी संस्थांच्या प्रमुखांशी सविस्तर चर्चा केली.
शैक्षणिक विस्तार आणि रोजगाराच्या नवीन संधी
चर्चेदरम्यान महाविद्यालयाला मिळालेला स्वायत्त दर्जा, नवीन शैक्षणिक उपक्रम, उद्योग-संस्था सहकार्य आणि विद्यार्थ्यांसाठी राबवली जाणारी सहा महिन्यांची अनिवार्य इंटर्नशिप या विषयांवर भर देण्यात आला. या संवादामुळे आगामी काळात महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर रोजगाराच्या व इंटर्नशिपच्या नवीन संधी उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तसेच औद्योगिक क्षेत्रासोबत शैक्षणिक भागीदारी अधिक मजबूत झाली आहे.
व्यवस्थापनाकडून कौतुक आणि अभिनंदन
राष्ट्रीय स्तरावर मिळालेल्या या अभूतपूर्व यशामुळे महाविद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. महाविद्यालयाच्या या यशस्वी सहभागाबद्दल आणि शैक्षणिक विस्तारासाठी केलेल्या उत्कृष्ट प्रयत्नांबद्दल महाविद्यालयाचे अध्यक्ष श्री ज्ञानदेव पाटील, उपाध्यक्ष श्री. प्रदीप कोलते, सचिव डॉ. अरविंद कोलते, खजिनदार श्री. सुधीर पाचपांडे व व्यवस्थापन मंडळाच्या सर्व सदस्यांनी प्राचार्य डॉ. अनिल खर्चे सह उपप्राचार्य डॉ. युगेश खर्चे, प्रा. आर. एम. चौधरी, प्रा. जयप्रकाश सोनोने तसेच सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले व पुढील वाटचालीस सदिच्छा दिल्या. “सर्वांच्या सहकार्याने ही यशाची वाटचाल अशीच पुढे सुरू राहो, हीच सदिच्छा!” असा विश्वास व्यवस्थापनाने व्यक्त केला आहे.

