बुलढाणा जिल्ह्यात अवैधरित्या रेती वाहतूक करणाऱ्यांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत नांदूरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून पाच टिप्पर जप्त केले आहेत. या कारवाईत सुमारे १० ब्रास रेतीसह एकूण ७६ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून पाच आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई २१ मे २०२६ रोजी रात्री ग्राम सावरगाव नेहू परिसरात करण्यात आली.
जिल्ह्यात विनापरवाना गौण खनिज उत्खनन आणि अवैध रेती वाहतूक रोखण्यासाठी बुलढाणा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांनी कठोर कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक यांनी विशेष पथक तयार करून अवैध रेती वाहतुकीविरोधात मोहीम राबविली.
स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, ग्राम सावरगाव नेहू परिसरातून काही जण टिप्परच्या सहाय्याने विनापरवाना रेती वाहतूक करत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक यांच्या पथकाने परिसरात सापळा रचून रस्त्याची नाकाबंदी केली. या कारवाईदरम्यान पाच टिप्पर पकडण्यात आले.
या प्रकरणात योगेश विजय काळे (रा. बेलाड, ता. मलकापूर), आकाश सुरेश कंडारकर (रा. झोडगा, ता. मलकापूर), शुभम माणिक इंगळे (रा. धरणगाव, ता. मलकापूर), लक्ष्मण धोंडू चव्हाण (रा. नेहरूनगर, ता. मोताळा) आणि प्रल्हाद सुपडा नरवाडे (रा. मेंढळी, ता. मोताळा) यांना ताब्यात घेण्यात आले. आरोपींकडून पाच टिप्पर किंमत अंदाजे ७५ लाख रुपये तसेच १० ब्रास रेती किंमत १ लाख रुपये असा एकूण ७६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या कारवाईप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक पंकज सपकाळे यांच्या फिर्यादीवरून नांदूरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) तसेच गौण खनिज कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास नांदूरा पोलीस करीत आहेत.
ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक आणि यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल वनिता शिंगणे, पोलीस कॉन्स्टेबल अमोल शेजोळ, अजीज परसुवाले, मनोज खरडे आणि शिवानंद हेलगे यांनी सहभाग घेतला.
