फैजपूर शहरातील प्रांत कार्यालय येथे ऑनलाइन औषध विक्री, बनावट औषधांचा वाढता धोका तसेच २० मे रोजी झालेल्या बंदच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शन व निर्देश बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत शहरातील सर्व फार्मासिस्ट, मेडिकल ओनर्स तसेच औषध व्यवसायाशी संबंधित नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
ऑनलाइन औषध विक्रीमुळे स्थानिक मेडिकल व्यवसायावर मोठा परिणाम होत असून बनावट औषधांच्या वाढत्या प्रमाणामुळे नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होत असल्याची चिंता यावेळी व्यक्त करण्यात आली. या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या बंदला फैजपूर शहरातील मेडिकल व्यावसायिकांनी मोठा प्रतिसाद दिला असल्याचे सांगण्यात आले.
या आंदोलनात युवा वर्गानेही सक्रिय सहभाग घेत जनजागृती करण्याचे महत्त्वपूर्ण काम केले. युवकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून तसेच प्रत्यक्ष उपस्थित राहून बंद यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे संपूर्ण बंद शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडल्याचे उपस्थितांनी नमूद केले.
बैठकीदरम्यान फैजपूर शहरातील सर्व मेडिकल ओनर्स, फार्मासिस्ट, कर्मचारी तसेच युवकांचे विशेष आभार व्यक्त करण्यात आले. नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित प्रश्नांवर एकत्रितपणे लढा देण्याची आवश्यकता असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले. तसेच बनावट औषधांविरोधात कठोर कारवाई आणि स्थानिक औषध व्यवसायाचे संरक्षण करण्यासाठी प्रशासनाने प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
