बुलढाणा जिल्ह्यातील धामणगाव बढे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लालमाती परिसरातून नाफेडचा 270 क्विंटल हरभरा भरलेला ट्रक अपहार केल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत पाच आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत ट्रकसह 18 लाख 91 हजार 750 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर गुन्हा 12 मे 2026 रोजी दाखल करण्यात आला होता, तर 20 मे रोजी हा गुन्हा उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले.
या प्रकरणातील फिर्यादी राजेंद्र आनंदराव जंगले हे संत गजानन कृषी विकास शेतकरी उत्पादक कंपनी खरेदी केंद्र, नाफेड सेंटर लालमाती किन्होळा, ता. मोताळा येथील अध्यक्ष आहेत. शेतकऱ्यांकडून खरेदी करण्यात आलेला धान्यसाठा वखार महामंडळ, मलकापूर येथे पाठविण्याचे काम सुरू असताना 12 मे रोजी लकी ट्रान्सपोर्ट, मोताळा मार्फत आलेल्या एमएच 43 यू 5290 क्रमांकाच्या ट्रकमध्ये 270 क्विंटल हरभरा भरून तो वखार महामंडळ, मलकापूर येथे पोहोचविण्याची जबाबदारी चालकाकडे देण्यात आली होती. मात्र चालकाने विश्वासघात करत ट्रक नियोजित ठिकाणी न नेता मालासह अपहार केल्याचे उघड झाले.
या घटनेनंतर पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तातडीने तपासाचे आदेश दिले होते. अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकरवाड व श्रेणिक लोढा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनिल अंबुलकर यांच्या नेतृत्वात विशेष पथक तयार करण्यात आले. पोलीस उपनिरीक्षक अविनाश जायभाये व त्यांच्या पथकाने समांतर तपास सुरू ठेवत सुमारे 200 किलोमीटर परिसरातील 300 हून अधिक सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. तसेच गोपनीय माहितीदार व तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने आरोपींचा शोध घेण्यात आला.
तपासादरम्यान शेख आमीन शेख जमील आणि त्याच्या साथीदारांचा मलकापूर येथे शोध लागला. चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी तेल्हारा येथे छापा टाकून गुन्ह्यात वापरलेला ट्रक, 118.35 क्विंटल हरभरा तसेच हरभरा विक्रीतून मिळालेली 3 लाख रुपयांची रोकड असा एकूण 18 लाख 91 हजार 750 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणात शेख आमीन शेख जमील (32), शेख समीर शेख सलीम (27), शेख सादिक शेख नुरमोहम्मद (24), मो. मुस्तकीन मो. मुशीर शेख (34) आणि सोहेल खान उर्फ शोएब युनुस खान (23) या पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. सर्व आरोपी मलकापूर परिसरातील रहिवासी आहेत.
या कारवाईत पोहेका दिपक लेकरवाळे, शेख चांद, गणेश पाटील, परशोत्तम आघाव, विजय पेठे, गजानन गोरेले, विकास देशमुख, निवृत्ती पंड तसेच तांत्रिक विश्लेषण विभागाचे पोहेका राज आडवे यांनी सहभाग घेतला. पुढील तपास धामणगाव बढे पोलीस करीत आहेत.
Tags:
Nafed Harbhara News, Buldhana Crime News, Dhamangaon Badhe Police, Local Crime Branch Buldhana, Harbhara Truck Theft, Malkapur Crime News, Maharashtra Crime News, Police Action Buldhana, NAFED Truck Case, Chana Truck Fraud, Buldhana Police News, Marathi Crime News, Harbhara Apahar Prakaran, Truck Driver Fraud, Malkapur Police Case
