सोप्या पद्धतीने ठरलेले लग्न; मेहेरून येथे दोन्ही कुटुंबांनी केला निकाह

जळगाव : लग्नासाठी स्थळ पाहण्याच्या निमित्ताने आलेल्या दोन्ही कुटुंबांनी विवाहातील अनावश्यक खर्चाला फाटा देत त्याच महफिलीचे निकाहच्या महफिलीत रूपांतर केले. जामनेर येथून स्थळ पाहण्यासाठी आलेले रेहान शेख रऊफ यांच्या कुटुंबीयांनी आणि जळगाव मेहेरून येथील मुलीचे वडील अकील शेख खलील यांच्या कुटुंबीयांनी साधेपणाने विवाह करण्याचा निर्णय घेतला. मुस्लिम धर्मगुरू मुफ्ती मोहम्मद हारून नदवी यांच्या उपस्थितीत असरच्या नमाजनंतर मस्जिद अल वजीर येथे निकाह पार पडला.
यावेळी मुफ्ती मोहम्मद हारून नदवी यांनी विवाहातील वाढत्या खर्चाबाबत मार्गदर्शन केले. साखरपुडा, विविध प्रकारचे महागडे खाद्यपदार्थ, मोठे लॉन्स तसेच चित्रपट आणि मालिकांमधील विवाह पद्धतींचे अनुकरण यामुळे समाजात विवाह अधिक खर्चिक आणि कठीण होत असल्याचे त्यांनी सांगितले.
मुफ्ती मोहम्मद हारून नदवी यांनी सांगितले की, विवाह सोपा आणि कमी खर्चात करण्याची गरज आहे. अनावश्यक खर्चाला आळा घालून निकाह सुलभ केल्यास कुटुंबांवरील आर्थिक भार कमी होण्यास मदत होईल. समाजात सुख, शांती, रहमत आणि बरकत हवी असेल तर विवाह सोप्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे त्यांनी आवाहन केले.
दोन्ही कुटुंबांनी याच महफिलीचे निकाहच्या महफिलीत रूपांतर करण्याचा निर्णय घेतल्यानंतर मुफ्ती मोहम्मद हारून नदवी यांनी निकाह पार पाडला. यावेळी त्यांनी नवदाम्पत्याला आशीर्वाद देत सुखी वैवाहिक जीवनासाठी दुआ केली.
साधेपणाने आणि कोणताही अनावश्यक खर्च न करता पार पडलेल्या या निकाहचे समाजातील उपस्थितांनी स्वागत केले. दोन्ही कुटुंबांचे अभिनंदन करत उपस्थितांनी नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा दिल्या.

