चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी रात्रीची पोलीस गस्त वाढविण्याची मागणी
समाजवादी पार्टीचे युवा जिल्हाध्यक्ष आजाद पठाण यांचे पोलीस अधीक्षकांना निवेदन
नांदुरा, दि. २१ सप्टेंबर २०२६ : सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्ह्यातील चोरी व घरफोडीच्या घटनांना आळा घालण्यासाठी रात्रीची पोलीस गस्त वाढविण्यासह शहर तसेच ग्रामीण भागातील गल्लीबोळांमध्ये नियमित पेट्रोलिंग करण्यात यावे, अशी मागणी समाजवादी पार्टीचे युवा जिल्हाध्यक्ष आजाद पठाण यांनी केली आहे. यासंदर्भात नांदुरा पोलीस निरीक्षकांमार्फत बुलढाणा जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांना निवेदन सादर करण्यात आले.
सण-उत्सवांच्या काळात नागरिक, व्यापारी तसेच महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने संवेदनशील भागांमध्ये विशेष पोलीस गस्त वाढविण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. तसेच बाजारपेठांमध्ये अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करावा आणि संशयास्पद व्यक्ती व वाहनांची कायदेशीररीत्या तपासणी करावी, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
नागरिकांनी भीतीच्या वातावरणात सण साजरे करण्याऐवजी सुरक्षित व निर्भय वातावरणात सण-उत्सव साजरे करावेत, यासाठी पोलीस प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना तातडीने राबवाव्यात, अशी मागणीही करण्यात आली.
यावेळी शेख नदिम, अझर मिर्झा, तोसीफ बिल्डर, आसीफ खान, मोहम्मद सलीम, शेख अजीम यांच्यासह समाजवादी पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

