मुक्ताईनगर बस स्थानकातील विद्यार्थी पास कक्ष बंद — विद्यार्थ्यांचे हाल
मुक्ताईनगर प्रतिनिधी …… येथील बस स्थानकातील विद्यार्थी पास कक्ष मागील काही दिवसांपासून बंद आहे. या ठिकाणाहून बोदवड भुसावळ रावेर तसेच कुऱ्हा, अंतुर्ली व तालुक्यातील संपूर्ण खेड्या-पाड्यांमधून आयटीआय, सीनियर कॉलेज, शॉर्टहँड-टायपिंगसाठी मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी ये-जा करतात.
प्रवाशांच्या सेवेसाठी व विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी असलेला हा पास कक्ष, उत्पन्नाच्या नावाखाली मुक्ताईनगर येथील स्थानक प्रमुख व आगार व्यवस्थापक यांनी बंद ठेवला आहे. प्रत्यक्षात, एसटी महामंडळ विद्यार्थ्यांना 66.66% इतकी सवलत देते, तसेच त्या सवलतीपोटी शासन महामंडळाला रक्कम अदा करत असताना देखील विद्यार्थ्यांना नाहक पूर्ण भाडे भरून प्रवास करावा लागत आहे.
सर्व विद्यार्थ्यांचे पास एकाच दिवशी किंवा एकाच तारखेला संपत नसल्यामुळे पास कक्ष नियमित सुरू ठेवणे अत्यंत गरजेचे असताना सध्या तो बंद आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे आर्थिक व शैक्षणिक नुकसान होत आहे.
त्यामुळे प्रशासनाने या बाबीकडे गंभीर दखल घेऊन मुक्ताईनगर बस स्थानकातील पास कक्ष तात्काळ नियमित सुरू करावा व विद्यार्थ्यांचे होणारे हाल थांबवावेत, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून व नागरिकांकडून केली जात आहे.





