ध्वनी प्रदूषण करणाऱ्या डीजे चालकाविरुद्ध मलकापूर शहर पोलिसांची कारवाई
मलकापूर : सार्वजनिक उत्सव, मिरवणुका तसेच सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांमध्ये निर्धारित ध्वनीमर्यादेचे उल्लंघन करून कर्कश आवाजात डीजे वाजवून ध्वनी प्रदूषण केल्याप्रकरणी मलकापूर शहर पोलिसांनी डीजे चालकाविरुद्ध कायदेशीर कारवाई केली आहे. पोलीस अधीक्षक, बुलढाणा यांच्या निर्देशानुसार 18 सप्टेंबर 2026 रोजी ही कारवाई करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आशिष रविंद्र अडकमोल, रा. सरस्वती नगर, भुसावळ, जि. जळगाव यांच्या ताब्यातील MH-43-AD-0205 क्रमांकाच्या वाहनावरील MADDY Sound डीजेचा वापर दोन वेगवेगळ्या मिरवणुकांमध्ये करण्यात आला. निवासी क्षेत्रात मोठ्या व कर्कश आवाजात डीजे वाजवून ध्वनी प्रदूषण केल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
या प्रकरणी मलकापूर शहर पोलीस ठाण्याकडून यापूर्वी संबंधित डीजे मालकाविरुद्ध पोलीस अधीक्षक, बुलढाणा यांच्याकडे अहवाल सादर करण्यात आला होता. त्यानंतर पोलीस अधीक्षकांकडून प्राप्त झालेल्या आदेशानुसार आशिष रविंद्र अडकमोल यांच्याविरुद्ध 18 सप्टेंबर 2026 रोजी मलकापूर शहर पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक 694/2026 अन्वये महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 मधील कलम 136 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर प्रकरणात ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम, 2000 मधील लागू तरतुदींनुसारही कायदेशीर कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. सार्वजनिक उत्सव आणि मिरवणुकांमध्ये ध्वनी प्रदूषणासंदर्भातील नियमांचे पालन करण्याबाबत यापूर्वीही सर्वोच्च न्यायालय तसेच राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या निर्देशानुसार कारवाई करण्यात आलेली आहे.
दरम्यान, मलकापूर शहर पोलिसांनी शहरातील नागरिकांना सण व उत्सव शांततेत आणि पारंपरिक वाद्यांच्या माध्यमातून साजरे करण्याचे आवाहन केले आहे. मिरवणुकांमध्ये डीजे किंवा ध्वनिक्षेपकाचा वापर करताना शासनाने निर्धारित केलेल्या ध्वनीमर्यादा, वेळेच्या अटी तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नियमांचे उल्लंघन करणाऱ्या डीजे चालक व मालकांसह कार्यक्रमासाठी डीजेची व्यवस्था करणाऱ्या किंवा संबंधित डीजे धारकांना कार्यक्रमात आमंत्रित करणाऱ्या व्यक्तींविरुद्धही प्रचलित कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा मलकापूर शहर पोलिसांनी दिला आहे.

