

मलकापूर: स्थानिक लोकसेवा बहुउद्देशीय मंडळ संचालित पद्मश्री डॉ. व्ही. बी. कोलते कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, मलकापूर येथील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा ‘ग्रँड अल्युमनी मीट २०२६’ रविवार, १७ मे २०२६ रोजी पुण्यातील आकुर्डी येथील ‘सीझन्स बँक्युएट’ हॉलमध्ये अत्यंत उत्साहात आणि भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला. “स्मृतींना उजाळा, नात्यांचे पुनरुज्जीवन”या ब्रीदवाक्याला सार्थ ठरवत माजी विद्यार्थ्यांनी या सोहळ्याला हजेरी लावली होती.
या दिमाखदार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल खर्चे हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून दाणा टीएम४ च्या मॅनेजर योगिता सुशीर व कविता सुशीर, तसेच ‘पिनॅकल इंडस्ट्रीज’चे डीजीएम मॅनेजर महादेव पाटील प्रामुख्याने उपस्थित होते.
महाविद्यालयाचे अध्यक्ष श्री. ज्ञानदेव पाटील आणि सचिव डॉ. अरविंद कोलते यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहू न शकल्याने व्हिडिओ क्लिपद्वारे विशेष संदेश पाठवून माजी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांनी आपल्या संदेशात विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे कौतुक केले व महाविद्यालयाच्या विकासात माजी विद्यार्थ्यांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे अधोरेखित केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाच्या मुख्य कमिटीचे आयक्यूएसी डीन प्रा. रमाकांत चौधरी, पॉलिटेक्निकचे उपप्राचार्य प्रा. संदीप खाचणे व ॲडमिनिस्ट्रेटिव्ह युगेश खर्चे यांनी विशेष परिश्रम घेतले. याप्रसंगी उपस्थित उद्योजकांनी आणि मान्यवरांनी माजी विद्यार्थ्यांना उद्योजकता व कॉर्पोरेट क्षेत्रातील नवनवीन संधींविषयी मोलाचे मार्गदर्शन केले. माजी विद्यार्थ्यांनीही आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देत महाविद्यालयाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन प्रा. सदाशिव लवंगे यांनी आपल्या खास शैलीत केले. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी विभाग प्रमुख प्रा. जयप्रकाश सोनोने, प्रा. साकेत पाटील, प्रा. सुदेश फरपट, प्रा. अंकुश नारखेडे, प्रा.पांडुरंग चोपडे, प्रा. मनोज वानखडे, प्रा. अमोल हळदे, प्रा. राजेश सरोदे, प्रा. मनिष आचेलिया, प्रा. पराग चोपडे आणि प्राध्यापिका शुभांगी निवाणे यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष सहकार्य केले. कार्यक्रमाचे मुख्य समन्वयक प्रा. डी. पी. खरात यांनी सर्वांचे आभार मानले. सकाळी ८:१५ वाजता नोंदणी व उद्घाटनाने सुरू झालेला हा सोहळा दुपारपर्यंत आठवणींचा गंध आणि भविष्यातील नात्यांची घट्ट वीण अधिक मजबूत करत आनंदात संपन्न झाला.
