
उदयनगर : जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त ११ ते १८ जुलै दरम्यान साजऱ्या होत असलेल्या लोकसंख्या स्थिरता सप्ताहाची सुरुवात शनिवारी प्राथमिक आरोग्य केंद्र, उदयनगर येथे विविध जनजागृती उपक्रमांनी झाली. राज्य कुटुंब कल्याण विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन आणि राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
यावर्षीच्या अभियानाचे घोषवाक्य “दोन जन्मात अंतर, कुटुंब सुखी निरंतर” असे असून, कुटुंब नियोजनाचा स्वीकार करून निरोगी माता, सुदृढ बालक आणि सशक्त कुटुंब घडविण्याचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आला.
यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वप्नील खंडागळे यांनी उपस्थित नागरिकांना कुटुंब नियोजनाचे महत्त्व, लोकसंख्या नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना, दोन अपत्यांमधील योग्य अंतराचे फायदे तसेच माता-बाल आरोग्य संवर्धनाविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. शासनामार्फत उपलब्ध असलेल्या मोफत कुटुंब नियोजन सेवांचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले. आरोग्य केंद्रातील वैद्यकीय व आरोग्य कर्मचाऱ्यांनीही नागरिकांचे समुपदेशन करून विविध गर्भनिरोधक साधनांची माहिती दिली.
सप्ताहानिमित्त प्राथमिक आरोग्य केंद्रात कंडोम (निरोध), ‘माला-एन’ व ‘छाया’ गर्भनिरोधक गोळ्या, ‘अंतरा’ गर्भनिरोधक इंजेक्शन, कॉपर-टी तसेच प्रसूतीपश्चात कॉपर-टी या सुविधा मोफत उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तसेच इच्छुक दाम्पत्यांसाठी स्त्री नसबंदी व पुरुष विनाटाका नसबंदी शस्त्रक्रियेसाठी नोंदणी व नियोजनाची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. शासनाच्या नियमानुसार लाभार्थींना प्रोत्साहनपर आर्थिक लाभही देण्यात येणार आहे.याशिवाय गरोदर मातांची एएनसी तपासणी, रक्तदाब, वजन, हिमोग्लोबिन तपासणी, लोह व फॉलिक ॲसिड गोळ्यांचे मोफत वितरण तसेच बालकांचे नियमित लसीकरण सुरू असून, गृहभेटी, माहितीपत्रकांचे वितरण, समुपदेशन शिबिरे, जनजागृती रॅली आणि समाजमाध्यमांच्या माध्यमातूनही लोकसंख्या स्थिरता व कुटुंब नियोजनाबाबत व्यापक जनजागृती करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.
डॉ. खंडागळे यांनी प्रत्येक नागरिकाने छोट्या, सुजाण व निरोगी कुटुंबाची संकल्पना स्वीकारून लोकसंख्या स्थिरतेच्या राष्ट्रीय अभियानात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले. यावेळी आरोग्य केंद्रातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.