मुक्ताईनगर प्रतिनिधी ।…..मुक्ताईनगर तालुक्यात दोन अज्ञात इसमांनी पोलीस असल्याचे भासवून एका ज्येष्ठ शेतकऱ्याची 60 हजार रुपयांची सोन्याची अंगठी लंपास केली. नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुरेश रघुनाथ बोठे (वय 69, रा. वढवे, ता. मुक्ताईनगर) हे दि. 17 मे 2026 रोजी बाजार करून मोटारसायकलने घरी परतत होते. त्या वेळी सालबर्डी गावाजवळ योगायोग हॉटेल परिसरात दोन अज्ञात व्यक्तींनी त्यांना अडवले. आरोपींनी स्वतःला पोलीस असल्याचे सांगून चौकशी सुरू असल्याचे भासवले.
दरम्यान, संशय निर्माण करून आरोपींनी फिर्यादी यांच्या हातातील एक 6 ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी आणि दुसरी 4 ग्रॅम वजनाची पुष्पराज असलेली सोन्याची अंगठी, एकूण 60 हजार रुपये किमतीच्या वस्तू घेऊन घटनास्थळावरून पसार झाले. त्यांनी तात्काळ पोलिसात तक्रार नोंदवली.
मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 0214/2026 अंतर्गत BNS कलम 204 व 318(4) प्रमाणे अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून, पुढील तपास पोहेकॉ. राजेश चव्हाण करीत आहेत. नागरिकांनी अशा प्रकारच्या फसवणुकीपासून सावध राहण्याचे आणि संशयास्पद हालचाली दिसल्यास तात्काळ माहिती देण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक आशिष आडसूळ यांनी केले आहे.