मलकापूर : तालुक्यातील ग्राम देवधाबा शिवारातील कमर्दीपुर परिसरात लोंबकळणाऱ्या विद्युत तारांमुळे शेतकऱ्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला असून तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणी शिवसेना (उबाठा) च्या वतीने करण्यात आली आहे. गट क्रमांक ४० व ४४ मधील दोन विद्युत पोलमधील अंतर अधिक झाल्याने पोल झुकले असून विद्युत तारा थेट जमिनीला टेकत असल्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.
या धोकादायक विद्युत तारांमुळे शेती मशागतीची कामे करताना अपघात होऊन जीवितहानी होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत संबंधित लाईनमन व वायरमन यांना अनेक वेळा तोंडी माहिती देण्यात आली असून महावितरण कंपनीकडे लेखी अर्जही सादर करण्यात आला होता. मात्र, याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
देवधाबा येथील शेतकरी श्रीकृष्ण लांडगे व संदीप लांडगे यांनी ही समस्या शिवसेना (उबाठा) उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांसह महावितरणच्या अभियंता शेख यांची भेट घेतली. यावेळी दोन दिवसांच्या आत विद्युत तारा व्यवस्थित करून झुकलेले पोल सरळ न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला.
तसेच महावितरण कंपनीच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशाराही गजानन ठोसर यांनी दिला. यावेळी शिवसेना शहरप्रमुख हरिदास गणबास, उपशहरप्रमुख बाळू पोलाखरे, संदीप लांडगे, विश्वनाथ पुरकर, संतोष लांडगे, योगेश लांडगे, मोहसीन आदी उपस्थित होते.

देवधाबा कमर्दीपुर शिवारातील लोंबकळणाऱ्या विद्युत तारांमुळे शेतकऱ्यांमध्ये भीती; शिवसेना (उबाठा) कडून आंदोलनाचा इशारा
-