सायबर चौकशी करून बीएनएस कलम २९९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यासाठी सकल मुस्लिम समाजाचे अमडापूर पोलिसांना निवेदन
उदयनगर : सोशल मीडियावरील एका युट्युब पॉडकास्टमध्ये इस्लाम धर्म, पैगंबर हजरत मोहम्मद (स.अ.व.) तसेच हजरत आयशा (र.अ.) यांच्याविषयी कथित आक्षेपार्ह व अवमानकारक वक्तव्य केल्याचा आरोप करत नाझिया इलाही खान याच्याविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी उदयनगर येथील सकल मुस्लिम समाजाच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात शुक्रवार दि. २६ अमडापूर पोलीस ठाण्यात निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, काही दिवसांपूर्वी एका युट्युब पॉडकास्टमधील कथित वक्तव्याची व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर प्रसारित झाली. या कथित वक्तव्यामुळे मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचा आरोप करण्यात आला असून, समाजात तेढ, वैमनस्य निर्माण होण्याबरोबरच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
सकल मुस्लिम समाजाने या प्रकरणाची सायबर सेलमार्फत सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. संबंधित व्हिडिओ, ऑडिओ तसेच अन्य डिजिटल पुराव्यांची तपासणी करून भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ मधील कलम २९९ तसेच लागू असलेल्या इतर कायदेशीर तरतुदींनुसार तात्काळ प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) नोंदवून संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
या निवेदनावर मुजम्मिल खान, रेहान खान, सय्यद रेहान, शेख इलियास, नदीम अन्सारी, चांद खान यांच्यासह सकल मुस्लिम समाजातील अनेक युवकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
