
मलकापूर येथे सकल जैन संघाच्या वतीने जैन संतांच्या पायी विहारादरम्यान घडणाऱ्या वाढत्या दुर्घटनांविरोधात तहसीलदारांमार्फत भारताचे गृहमंत्री यांना निवेदन सादर करण्यात आले. मध्य प्रदेशातील रीवा परिसरात 20 मे 2026 रोजी घडलेल्या भीषण अपघाताच्या निषेधार्थ हे निवेदन देण्यात आले असून, संबंधित घटनेची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, रीवा परिसरात परम पूज्य आर्यिका श्री सौम्यमती माताजी यांच्या संघातील दोन आर्यिका माताजी प्रातःकालीन विहारासाठी जात असताना भीषण रस्ते अपघाताला सामोरे गेल्या. या दुर्घटनेत पूज्य आर्यिका 105 श्री श्रुतमती माताजी यांचे घटनास्थळाजवळ समाधीमरण झाले. तसेच दुसऱ्या संघस्थ साध्वी पूज्य आर्यिका 105 श्री उपशममती माताजी या गंभीर जखमी झाल्या होत्या. उपचारादरम्यान त्यांचेदेखील समाधीपूर्वक देवलोकगमन झाले.
या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण जैन समाजात शोककळा पसरली असून संत समाजाच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. जैन साधू, साध्वी आणि तपस्वी हे आगमानुसार सदैव पायी विहार करीत असतात. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने आवश्यक उपाययोजना करणे, योग्य सेवा उपलब्ध करून देणे तसेच त्यांच्या सन्मान आणि सुरक्षेबाबत तत्परता ठेवणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
भविष्यात देशभरात अशा प्रकारच्या दुर्घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांनी ठोस पावले उचलावीत, अशी मागणीदेखील करण्यात आली आहे. हे निवेदन तहसीलदारांमार्फत भारताचे गृहमंत्री, तसेच महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश राज्यांचे गृहमंत्री यांना पाठविण्यात आले.
या निवेदनावर श्री दिगंबर जैन समाज मलकापूरचे संघपती सुहास (बंडू) चवरे, श्री श्वेतांबर मूर्तिपूजक जैन संघ मलकापूरचे संघपती भस्तकुमार दंड, श्री स्थानकवासी जैन संघ मलकापूरचे संतोषकुमार संचेती यांच्यासह सकल श्री जैन संघ मलकापूर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
