भानगुरा जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थी गैरहजर; महिला शिक्षिकेसाठी पालकांचे आंदोलन
शाळा सुरू पण विद्यार्थी गैरहजर! भानगुरा गावात पालकांचा मोठा रोष; सरकारी शाळा ओस पाडून खाजगीकरणाला खतपाणी घालण्याचा डाव? ठाकरे सेनेचा आंदोलनाला उग्र पाठिंबा!
मलकापूर (प्रतिनिधी):
घंटेचा नाद झाला, वर्ग उघडले, शिक्षकही हजर राहिले; मात्र शाळेच्या पटांगणात शुकशुकाट होता! मलकापूर तालुक्यातील भानगुरा येथे आज जिल्हा परिषद शाळेची घंटा वाजली खरी, पण शाळेत एकही विद्यार्थी फिरकला नाही. एका बाजूला शहरात नगरपालिका व जिल्हा परिषदेच्या सरकारी शाळा पटाअभावी आणि अनास्थेमुळे एकामागोमाग एक बंद पडत असून खाजगी शाळांचे उखळ पांढरे होत आहे. सरकारी यंत्रणेच्या याच ढिम्म कारभारामुळे ग्रामीण भागातील शाळाही संपवण्याचा हा डाव आहे का, असा संतप्त सवाल आता उपस्थित होत आहे. भानगुरा येथील पालकांनी महिला शिक्षिकेच्या मागणीसाठी थेट मुलांचा शाळाप्रवेश रोखून प्रशासनाला जोरदार चपराक लगावली आहे. या आक्रमक आंदोलनाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपजिल्हाप्रमुख प्रमुख गजानन ठोसर यांनी जाहीर व उग्र पाठिंबा दर्शवला आहे.
भानगुरा येथील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता पहिली ते सहावीपर्यंतचे वर्ग भरतात. परंतु गेल्या तब्बल चार ते पाच महिन्यांपासून येथे एकही महिला शिक्षिका नियुक्त करण्यात आलेली नाही. सहाव्या वर्गातील १२ वर्षांच्या वयात पदार्पण करणाऱ्या विद्यार्थिनींना अनेक शारीरिक, मानसिक व वैयक्तिक समस्या असतात. अशा नाजूक अडचणी त्या पुरुष शिक्षकांसमोर कशा मांडणार, हा आक्रंदणारा प्रश्न गावातील वंदना धम्मपाल झनके, माधुरी बावस्कर, छाया नस्ते, संगीता चव्हाण, संगीता रायपुरे, राजेश चव्हाण, अविनाश चव्हाण, रॉबिन चव्हाण, सूर्यकांत पाटील, संतोष चव्हाण, शुभम टकले, प्रभाकर जवरे, संदीप नस्ते, संचित कऱ्हे, सचिन चव्हाण, श्रीधर नरोटे, सुधाकर बावस्कर, प्रशांत बावस्कार, भगवान पाटील, मुकेश चव्हाण, गोकुळ चव्हाण, अर्जुन चव्हाण, ज्ञानेश्वर पाटील, सम्राट रायपुरे, गणेश बावस्कार, सुपडा रायपुरे, युवराज रायपुरे, देवेंद्र रायपुरे सह आदिं महिला व पालकांनी उपस्थित केला आहे. प्रशासनाच्या वारंवार चालढकल वृत्तीला कंटाळून अखेर पालकांनी थेट ‘शाळा सुरू, पण मुले घरातच’ असा निर्वाणीचा पवित्रा घेतला आणि शाळेवर अघोषित बहिष्कार टाकला.
सरकारी शाळांमधील अशा मूलभूत सोयी-सुविधा आणि शिक्षकांची वानवा पाहून पालक हताश होत आहेत, ज्याचा थेट फायदा गब्बर होत चाललेल्या खाजगी शाळांना मिळत आहे. या संपूर्ण प्रकरणावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपजिल्हाप्रमुख प्रमुख गजानन ठोसर यांनी अत्यंत कडक भूमिका घेत प्रशासनाला थेट इशारा दिला आहे. ठोसर यांनी स्पष्ट केले की, “पालकांची आणि विशेषतः गावातील महिलांची मागणी अत्यंत रास्त असून प्रशासनाचा हा नाकर्तेपणा आम्ही सहन करणार नाही. जोपर्यंत भानगुरा शाळेत पूर्णवेळ महिला शिक्षिका दिली जात नाही, तोपर्यंत हे आंदोलन असेच धगधगत राहील आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष गावकऱ्यांच्या पाठीशी खंबीर ढाल बनून उभा राहील”.
विद्यार्थ्यांच्या अनुपस्थितीमुळे आज शाळेत निर्माण झालेली ही शांतता शिक्षण विभागासाठी धोक्याची घंटा असून, आता शासन यावर तातडीने तोडगा काढते की आंदोलन आणखी भडकण्याची वाट पाहते, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

