मलकापूर बातम्या

Malkapur News

मलकापूर तहसील कार्यालयातील प्रलंबित महसूल प्रकरणांवर शिवसेना आक्रमक; अन्यथा तीव्र जनआंदोलनाचा इशारा

मलकापूर : प्रतिनिधी

मलकापूर तालुक्यातील तहसील कार्यालयात शेतरस्ते, बेकायदेशीर फेरफार नोंदी, जमिनीवरील अतिक्रमणे आणि अन्य महसूलविषयक प्रकरणे दीर्घकाळापासून प्रलंबित असल्याच्या तक्रारींवरून शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. या प्रकरणांचा तातडीने निपटारा करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी शिवसेनेचे मलकापूर तालुकाप्रमुख दीपक चांभारे पाटील यांनी उपविभागीय अधिकारी (महसूल), मलकापूर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

तालुक्यातील काही भागांत धनदांडगे आणि भूमाफिया प्रवृत्तीचे लोक शेतकऱ्यांचे अधिकृत शेतरस्ते उकरून, कंपाऊंड करून अथवा अतिक्रमण करून बंद करीत असल्याच्या तक्रारी आहेत. तसेच काही प्रकरणांमध्ये बेकायदेशीर फेरफार नोंदी केल्यामुळे शेतकऱ्यांच्या जमिनींच्या मालकी हक्कांवर परिणाम होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

महसूल विभागातील प्रकरणांचा वेळेत निपटारा होत नसल्यामुळे अतिक्रमण करणाऱ्या आणि दादागिरी करणाऱ्या प्रवृत्तींना प्रोत्साहन मिळत असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. सामान्य शेतकरी व नागरिकांना धमकावणे, जमिनींवर अतिक्रमण करणे आणि विनाकारण वाद निर्माण करण्याचे प्रकार वाढत असल्याने ग्रामीण भागात सामाजिक तणाव आणि कायदा-सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होत असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.

विशेष म्हणजे, अनेक महसूल प्रकरणांमध्ये दोन्ही पक्षांचे म्हणणे नोंदविण्यात आले असून तलाठी व मंडळ अधिकारी यांचे स्थळपाहणी अहवाल, पंचनामे आणि मोजणी नकाशेही सादर झालेले आहेत. तरीदेखील अंतिम निर्णय घेण्यास विलंब होत असल्याबद्दल शिवसेनेने नाराजी व्यक्त केली आहे.

प्रलंबित महसूल प्रकरणांचा तातडीने आढावा घेऊन प्रत्येक प्रकरणाच्या निर्णयासाठी निश्चित कालमर्यादा ठरवावी, तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांना आवश्यक अहवाल वेळेत सादर करण्याचे निर्देश द्यावेत, अतिक्रमण करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी तसेच बेकायदेशीर फेरफार नोंदींची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशा विविध मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत.

शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका!

शेतकऱ्यांच्या हक्कांवर गदा येत असताना महसूल प्रशासनाने बघ्याची भूमिका घेणे सहन केले जाणार नाही. निवेदनाची तातडीने दखल घेऊन ठोस कार्यवाही न झाल्यास अन्यायग्रस्त शेतकरी आणि नागरिकांना सोबत घेऊन तहसील कार्यालयासह संबंधित महसूल प्रशासनाविरोधात तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशारा तालुकाप्रमुख दीपक चांभारे पाटील यांनी दिला. शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत शिवसेनेचा संघर्ष सुरूच राहील, अशी भूमिकाही त्यांनी व्यक्त केली.

या निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी, बुलढाणा यांनाही पाठविण्यात आली आहे.

यावेळी शिवसेनेचे मलकापूर तालुकाप्रमुख दीपक चांभारे पाटील, शहरप्रमुख हरिदास गणबास, राम थोरबोले, पराग नाफडे, राजेंद्र काजळे, पांडुरंग चिम, संदीप खडसने, रमेश जामोदे, हरिदास शिंदे, रोहिदास माळी, नंदू परसे, रमेशसिंग राजपूत, शेख रफीकभाई पजायेवाले, जगदीश रत्नपारखी, दीपक कोथळकर, अमोल मोरे, अनिल श्रीखंडे, गणेश शिंदे, आत्माराम कहाते यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.