मलकापुरात तुटलेल्या ढाप्याची दुरुस्ती न झाल्यास आंदोलनाचा इशारा; नगर परिषद प्रशासनाला पुन्हा निवेदन
मलकापूर: शहरातील पारपेठ, मदार टेकडी भागातील नालीवरील तुटलेल्या ढाप्याची तत्काळ दुरुस्ती करण्यात यावी, या मागणीसाठी स्थानिक रहिवाशांनी मलकापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी आणि नगराध्यक्ष यांना पुन्हा एकदा निवेदन सादर केले आहे. यापूर्वी निवेदन देऊनही नगर परिषद प्रशासनाने कोणतीही दखल न घेतल्याने नागरिकांमध्ये नाराजी पसरली असून, लवकर काम सुरू न झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
मदार टेकडी परिसरातील अझीझ टेलर यांच्या दुकानासमोर नालीवर बसवण्यात आलेला सिमेंटचा ढापा एका बाजूने पूर्णपणे फुटला आहे. या मार्गावरून दररोज मोठ्या संख्येने नागरिक आणि शाळकरी विद्यार्थी ये-जा करतात. ढापा तुटल्यामुळे पादचाऱ्यांना चालणे अत्यंत कठीण झाले असून, वाहनचालकांसाठीही अपघाताचा मोठा धोका निर्माण झाला आहे. कोणत्याही क्षणी येथे गंभीर दुर्घटना घडू शकते, त्यामुळे येथे नवीन आणि मजबूत ढापा तातडीने बसवणे गरजेचे आहे.
स्थानिक रहिवासी सगीर शाह नझीर शाह यांनी या समस्येबाबत १४ ऑगस्ट २०२६ रोजी नगर परिषदेत पहिले निवेदन दिले होते. मात्र, दीर्घ कालावधी उलटूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आली नाही. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा विचार करून प्रशासनाने या तुटलेल्या ढाप्याचे काम तातडीने सुरू करावे, अन्यथा नागरिकांना आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.

